बलुचिस्तानात शक्तीशाली बॉम्बस्फोट, 25 ठार
By admin | Published: May 12, 2017 05:41 PM2017-05-12T17:41:18+5:302017-05-12T18:25:54+5:30
बलुचिस्तानात क्वेट्टा येथील मस्तांग भागामध्ये शुक्रवारी दुपारी झालेल्या शक्तीशाली बॉम्बस्फोटात 25 जण ठार झाले.
Next
ऑनलाइन लोकमत
क्वेट्टा, दि. 12 - बलुचिस्तानात क्वेट्टा येथील मस्तांग भागामध्ये शुक्रवारी दुपारी झालेल्या शक्तीशाली बॉम्बस्फोटात 25 जण ठार झाले असून, अनेक जण जखमी झाले आहेत. सिनेटचे उपप्रमुख मौलाना गफुर हैदरी सुद्धा या स्फोटात जखमी झाले असून, त्यांच्याच ताफ्याला लक्ष्य करण्याच्या उद्देशाने हा बॉम्बस्फोट घडवण्यात आला. शुक्रवारचा नमाज संपल्यानंतर हा बॉम्बस्फोट घडवण्यात आला.
मौलाना गफुर हैदरी जमात-ई-इस्लामी पक्षाशी संबंधित आहेत. ते थोडक्यात या स्फोटातून बचावले. त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. मौलाना गफुर हैदरी हे हल्लेखोरांचे लक्ष्य होते. हा आत्मघातकी हल्ला होता अशी माहिती पाकिस्तान पोलिसांनी दिली आहे.
शुक्रवारची नमाज अदा झाल्यानंतर गफुर हैदरी यांचा ताफा मशिदीच्या बाजूने जात असताना शक्तीशाली बॉम्बस्फोट झाला. मौलाना गफुर जखमी झाले असले तरी, त्यांच्या प्रकृतीला धोका नाही. त्यांना क्वेट्टा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.सुरक्षापथकांनी घटनास्थळाला घेराव घातला आहे. पाकिस्तानचे अंतर्गत मंत्री चौधरी निसार यांनी हल्ल्याचा निषेध केला असून, या स्फोटाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.