अमेरिकेत हिमवादळाचा कहर, जनजीवन गारठले
By admin | Published: February 17, 2016 02:52 AM2016-02-17T02:52:37+5:302016-02-17T02:52:37+5:30
अमेरिकेतील अनेक राज्यांत हिमवादळाचा जबर तडाखा बसला असून थंडीच्या कडाक्याने जनजीवन गारठले आहे. वादळासोबत पाऊसही कोसळत असल्याने पुराचा धोकाही वाढला आहे.
वॉशिंग्टन/न्यूयॉर्क : अमेरिकेतील अनेक राज्यांत हिमवादळाचा जबर तडाखा बसला असून थंडीच्या कडाक्याने जनजीवन गारठले आहे. वादळासोबत पाऊसही कोसळत असल्याने पुराचा धोकाही वाढला आहे. जवळपास १७ राज्यांना हिमवादळाने विळखा घातला असून काही नद्याही थंडीमुळे गोठल्या आहेत. विमानसेवेसह रस्त्यांवरील वाहतूक ठप्प पडली असून वादळाच्या फटक्याने पूर्व किनारपट्टी ते दक्षिण किनारपट्टीत झाडे आडवी झाली आहेत. घरांच्या छतावर तसेच अंगणासह आसपासच्या भागात दोन ते चार इंच बर्फाची थप्पी साचल्याने लोकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. घराबाहेर आणि रस्त्यांवर उभ्या असलेल्या कार बर्फाच्या ढिगाऱ्यात गडप झाल्या आहेत.
जॉर्जिया ते मेन, मिसिसिपी, अल्बामा, फ्लोरिडा पॅनहॅण्डल, नॉर्थ कॅरोलिना, न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, पेनसिल्व्हानियासह १७ राज्यांतील शहरांनी बर्फाची चादरच पांघरल्याचे दृश्य दिसते. अनेक महत्त्वाच्या विमानतळांवरील दृश्यमानताही धूसर झाल्याने जवळपास १६०० विमान उड्डाणे रद्द करावी लागली.
ल्युसियाना ते अल्बामापर्यंत हिमवादळाने विळखा घातला आहे. गारांसोबत जोरदार वारेही वाहत असल्याने अमेरिकेतील उत्तर ते दक्षिण भागातील जनजीवन जाम गारठले आहे.
सोमवारी ‘प्रेसिडेन्ट डे’मुळे सुटी असल्याने शाळा आणि कार्यालये बंद असल्याने या लहरी हवामानाचा जनजीवनाला जास्त फटका बसला नाही. व्हर्जियाना, केंटुकी, वेस्ट व्हर्जियाना आणि मेरीलँड येथे जागोजागी बर्फाचे ढिगारे साचले असून अनेक ठिकाणचे तापमान शून्याखाली आले आहे. (वृत्तसंस्था)