पाकिस्तानात बहरतोय डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2022 08:49 AM2022-11-03T08:49:19+5:302022-11-03T08:50:01+5:30

पाकिस्तानी लोक डॉ. आंबेडकरांचे कार्य आणि विचारांवर प्रेम करणारे आहेत. अलीकडच्याच प्रवासात आलेल्या अनुभवांवर आधारलेले हे टीपण!

Blooming in Pakistan Dr. The legacy of Babasaheb Ambedkar thoughts! | पाकिस्तानात बहरतोय डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा!

पाकिस्तानात बहरतोय डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा!

Next

- डॉ. प्रदीप आगलावे

सर्वसामान्य भारतीयांच्या आणि पाकिस्तानी लोकांच्या मनात एकमेकांविषयी बरेच गुंतागुंतीचे काहीतरी असते. उत्सुकता असते तसे गैरसमजही असतात!  पाकिस्तानला अलीकडेच तीनदा गेलो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा अभ्यासक म्हणून मला पाकिस्तानचे निमंत्रण मिळाले होते, हे विशेष! पाकिस्तानी लोक डॉ. आंबेडकरांचे कार्य आणि विचारांवर प्रेम करणारे आहेत. पाकिस्तानात डॉ. आंबेडकरांच्या नावाने अनेक संस्था कार्यरत आहेत. 

‘आंबेडकर सोसायटी फॉर साऊथ आशिया’, ‘सेंटर फॉर साऊथ एशियन स्टडीज्’ आणि पंजाब विद्यापीठ, लाहोरच्या संयुक्त विद्यमाने डॉ. आंबेडकर यांच्या तत्त्वज्ञानावर आंतरराष्ट्रीय परिषद लाहोर येथील पंजाब विद्यापीठात नुकतीच आयोजित करण्यात आली होती.
यावेळेस माझ्यासोबत भारतातील डॉ. सीमा माथूर (दिल्ली विद्यापीठ), बेझवाडा विल्सन (दिल्ली), डॉ. सुजाता सुरेपल्ली (तेलंगणा) हे तीन प्रतिनिधी होते. लाहोरला जायचे होते. आम्ही अमृतसरहून गाडीने वाघा बॉर्डरला गेलो. भारतीय इमिग्रेशनची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एका बसने आम्हाला भारत - पाकिस्तानच्या सीमेवर नेण्यात आले.

पाकिस्तानचे फाटक उघडून अधिकारी बाहेर आले, ते भारतीय अधिकाऱ्याशी हात मिळवून बोलले आणि आत निघून गेले. आम्ही पाकिस्तानच्या फाटकाकडे गेलो. त्यांनी पासपोर्ट तपासून आम्हाला आत घेतले. पाकचे इमिग्रेशन अधिकारी वाकइस नकवी यांनी हसून स्वागत केले. परिषदेचे आयोजक डॉ. सय्यद शहीन हसन यांच्यासोबत आम्ही लाहोरच्या दिशेने निघालो. अटारी - वाघा बॉर्डरपासून लाहोर शहर केवळ २३ किलोमीटर अंतरावर आहे.

आंतरराष्ट्रीय परिषदेच्या एक दिवस आधी लाहोर येथील मुस्लीम, हिंदू, दलित आणि ख्रिश्चन प्रतिनिधींसोबत आमची चर्चा ठेवण्यात आली होती. सर्वांनी भारताविषयी गौरवोद्गार काढले. अनेक लोकांचे असे मत होते की, फाळणीने देशाचे विभाजन झाले नसते तर आज भारत देश आशिया खंडातील एक प्रमुख शक्ती म्हणून उदयाला आला  असता. 

१३ ऑक्टोबर २०२२ रोजी डॉ. आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानावर आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न झाली. या परिषदेचे मुख्य अतिथी भारतातील पाकिस्तानचे माजी राजदूत मा. शमशाद अहमद हे होते. ते आपल्या भाषणात म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने मानवतावादी होते. डॉ. आंबेडकर यांचे विचार आजही संपूर्ण जगाला मार्गदर्शक आहेत. त्यांनी आयुष्यभर संघर्ष करून शोषित आणि वंचित समाजाला मानवी अधिकार प्राप्त करून दिले. ही आधुनिक मानवी इतिहासातील एक फार मोठी घटना आहे. दक्षिण आशियातील देशांना आपला विकास करायचा असेल तर डॉ. आंबेडकर यांच्या विचारांशिवाय पर्याय नाही.”

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक न्यायाच्या तत्त्वज्ञानाचा दक्षिण आशियामध्ये प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने आंबेडकर सोसायटी फॉर साऊथ आशिया (पाकिस्तान)  ही संस्था सप्टेंबर २०१७मध्ये स्थापन करण्यात आली. ही संस्था दक्षिण आशियातील शोषित आणि सीमांत अल्पसंख्याक समुदायाच्या विशेषत: दलितांच्या उत्थानाकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक न्यायाच्या तत्त्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य करते. डॉ. आंबेडकरांच्या अनुयायांना एकत्रित करून दक्षिण आशियातील अल्पसंख्याक आणि कनिष्ठ जातीच्या गरीब लोकांना वंचितता आणि शोषणापासून वाचविण्यासाठी संयुक्त प्रयत्न करणे, हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे.

पाकिस्तानातील ‘गंगाराम हेरिटेज फाऊंडेशन’ ही अल्पसंख्याक लोकांकरिता काम करणारी एक महत्त्वाची संस्था. या संस्थेचे संचालक डॉ. सय्यद शहीन हसन सांगत होते, ‘‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ भारतातील शोषित, पीडित लोकांकरिताच कार्य केले नाही तर त्यापलीकडे त्यांचे कार्य होते. डॉ. आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानावर विद्यार्थ्यांनी संशोधन करावे, याकरिता पाकिस्तानात विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली जाते.’’ 

पाकिस्तानमध्ये डॉ. आंबेडकर यांच्या विचार आणि कार्याचा प्रचार आणि प्रसार सातत्याने होत आहे. डॉ. आंबेडकरांच्या मानवतावादी आणि सामाजिक न्यायाचा अर्थात त्यांचा वैचारिक वारसा पुढे नेण्याचे कार्य पाकिस्तानमधील काही मंडळी करत आहेत.
लाहोर शहरात फिरताना आम्हाला कुठेही परकेपणा जाणवला नाही, हेही महत्त्वाचे! भारताचे १०० रुपये म्हणजे पाकिस्तानी २६४ रुपये होतात. त्यामुळे पाकिस्तानात खरेदीचा  वेगळा आनंद मिळतो, हेही नोंदवून ठेवतो. 

 

Web Title: Blooming in Pakistan Dr. The legacy of Babasaheb Ambedkar thoughts!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.