BMM अधिवेशन! अमेरिकेत मराठी ‘उत्तररंगा’ची तयारी; फॉर हियर, फॉर शुअर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 07:33 AM2024-06-28T07:33:52+5:302024-06-28T07:34:04+5:30

सान होजे बीएमएम अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नावर विशेष चर्चासत्र; मराठी भाषा शिकण्यासाठीही उपक्रम 

BMM convention Preparation of Marathi Uttaranga in America | BMM अधिवेशन! अमेरिकेत मराठी ‘उत्तररंगा’ची तयारी; फॉर हियर, फॉर शुअर

BMM अधिवेशन! अमेरिकेत मराठी ‘उत्तररंगा’ची तयारी; फॉर हियर, फॉर शुअर

सान होजे : सगळे आयुष्य कामात उत्तम जाते... उतारवयात काय हवे असते माणसाला?- दोन एफ लागतात फक्त... आवडीचे फुड आणि जीवाभावाचे फ्रेंडस! फ्लोरिडामध्ये राहणारे अविनाश आणि नीलिमा पटवर्धन सान होजेमधल्या हिल्टन हॉटेलच्या लॉबीमध्ये ‘ लोकमत’ शी बोलत होते. कर्तेपणाचे सारे आयुष्य अमेरिकेत उत्तमप्रकारे पार पाडल्यावर निवृत्त झालेले आणि मित्रमैत्रिणींच्या भेटीच्या ओढीने बीएमएम अधिवेशनाला येणारे त्यांच्यासारखे ज्येष्ठ नागरिक बहुसंख्य ! परदेशात वयस्क होणारी ही मराठी माणसांची पहिलीच पिढी ! 

ज्या लोकांचा साहित्यिक, सांस्कृतिक, व्यक्तिगत एकटेपणा दूर व्हावा म्हणून उत्तर अमेरिकाभर महाराष्ट्र मंडळे स्थापन झाली, त्याच लोकांच्या उत्तरायुष्यातले प्रश्न सोडविण्यासाठी आता बृहन्महाराष्ट्र मंडळाने पुढाकार घेतला आहे. विद्या आणि अशोक सप्रे यांनी पंचवीस वर्षांपूर्वी या धडपडीचे नाव ठेवले ‘ उत्तररंग’! 
आता बीएमएम अधिवेशनात उत्तररंगसाठी पहिला अख्खा दिवस राखून ठेवलेला असतो. सान होजे येथल्या एकविसाव्या अधिवेशनाचा पूर्वरंगही हीच चर्चा करणारा असेल.

स्थानिक वेळेनुसार गुरुवारी सकाळी नऊ वाजता ‘लोकमत’च्या कार्यकारी संपादक अपर्णा वेलणकर यांच्या बीजभाषणाने या दिवसाची सुरुवात होईल. बीएमएमचे अध्यक्ष संदीप दीक्षित यांनी उत्तररंग या उपक्रमाला गती दिली. आता अमेरिकेतल्या आनंदी वानप्रस्थाश्रमाच्या तयारीला वेग आला आहे.

बीएमएम २.० : अमेरिकेत मराठी शाळा, उद्योजकता विकास 

  • अमेरिकाभरात विखुरलेल्या मराठी मंडळांनी बसविलेल्या एकांकिकांची स्पर्धा हे यावर्षीच्या अधिवेशनाचे वैशिष्ट्य होय ! गुरुवारी दिवसभर ही स्पर्धा रंगेल.
  • अमेरिकन मराठी घरांमधल्या मुलांनी मराठी भाषा शिकावी यासाठी प्रयत्न करणाऱ्या मराठी शाळांचा उपक्रम जोमाने सुरू आहे. अधिवेशनात या उपक्रमात सहभागी लोकांसाठी विशेष आयोजन केलेले आहे.
  • बी कनेक्ट या शीर्षकाअंतर्गत मराठी उद्योजकता विकासाची विशेष सत्रेही गुरुवारी होतील.

सिलिकॉन व्हॅलीमध्ये घुमणार ढोलताशांचा जल्लोष 
सान होजे कन्व्हेन्शन सेंटरच्या विस्तीर्ण आवारात उभारलेल्या तुळशी वृंदावनाला लागून असलेल्या जागेत बुधवारची रात्र जागविली ती अमेरिकेतून आलेल्या आठ ढोल पथकांनी ! एरवी अमेरिकेतल्या सॉफ्ट वेअरपासून बँकिंगपर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे हे तरुण भारतातून आलेल्या नव्याकोऱ्या ढोलांच्या वाद्या आवळण्यात गर्क होते का. का?- कारण यावर्षीच्या बीएमएममध्ये चक्क आठ ढोल-ताशा पथकांची खणखणीत स्पर्धा होणार आणि त्यात भरघोस बक्षीसही मिळणार आहे. कन्व्हेन्शन सेंटरला लागून असलेल्या हिल्टन आणि मरियट या दोन्ही हॉटेल्समधल्या देशी-विदेशी पाहुण्यांची पावले आत्तापासूनच ढोल ताशांभोवती रेंगाळू लागली आहेत.

Web Title: BMM convention Preparation of Marathi Uttaranga in America

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.