River Boat Accident:प्रवाशांनी भरलेली बोट बुडाली, 51 प्रवाशांचा मृत्यू तर 60 पेक्षा जास्त बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2021 10:09 AM2021-10-10T10:09:35+5:302021-10-10T10:17:47+5:30
Congo River Boat Accident: काँगोमध्ये अनेकदा बोटीचे अपघात होत असतात, 2010 मध्ये बोट अपघातात 135 लोकांचा मृत्यू झाला होता.
किन्शासा: डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये बोट पलटी झाल्याने मोठा अपघात घडला आहे. या घटनेत आतापर्यंत 50 हून अधिक लोकांचे मृतदेह सापडले असून, 60 पेक्षा जास्त लोक बेपत्ता आहेत. अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 39 जणांना सुखरूप वाचवण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या बोटीवर क्षमतेपेक्षा जास्त लोकांना बसवण्यात आलं होतं. तसेच, बोटीवर चढण्यापूर्वी प्रवाशांची मोजणी केली नव्हती, त्यामुळे बेपत्ता लोकांच्या संख्येचा अंदाज लावणे कठीण जात आहे. सध्या बेपत्ता झालेल्या प्रवाशांना शोधण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, खराब हवामान किंवा बोटीवरील गर्दीमुळे हा अपघात झाला असावा, असे अधिकाऱ्यांचे मत आहे.
काँगोमध्ये अनेकदा बोट अपघात होतात
काँगोमध्ये बोटीतून प्रवास करताना अनेकजण लाईफ जॅकेट घालत नाहीत, त्यामुळे येथे बोट अपघात सामान्य आहे. यापूर्वीही अनेकदा अशाप्रकारचे बोट अपघात झाले आहेत. या वर्षी फेब्रुवारीमध्ये माई-नोंडम्बे प्रांतातील कांगो नदीत एक बोट उलटली होती. त्यात 60 लोकांचा मृत्यू झाला होता. त्या बोटीवर 700 हून अधिक प्रवासी होते. प्रवासी जास्त चढल्यामुळे हा अपघात झाल्याचे तपासात उघड झाले.
2010 मध्ये बोट अपघातात 135 लोकांचा मृत्यू
जानेवारी 2021 मध्ये कांगोतील किवु तलावामध्ये एक प्रवासी बोट बुडाल्याने तीन जण ठार झाले होते. त्यात दोन मुले आणि एका महिलेचा समावेश होता. तर मे 2020 मध्ये किवु लेकमध्ये बोट पलटी झाल्याने 10 लोकांचा मृत्यू झाला. त्यापूर्वी जुलै 2010 मध्ये पश्चिम बंडुंडू प्रांतात एक बोट पलटी होऊन 135 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता.