सुनेचा पाठपुरावा, सासऱ्याची जिद्द...; वयाच्या नव्वदीत मिळविली पदवी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 09:30 AM2024-07-02T09:30:04+5:302024-07-02T09:30:39+5:30
सैन्यातून सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी पैसे मिळवण्यासाठी पेपर मिलमध्ये काम करण्यास सुरुवात केली. तिथे त्यांनी ४० वर्षं काम केलं.
आयुष्यात सर्व काही मिळवलं तरी माणूस न जमलेल्या गोष्टींबद्दल खंत करत राहतो. हे अनेकांच्या बाबतीत होतं. पण माणसाचा स्वभावच तो असं म्हणून ते स्वत: आणि इतरही त्याकडे दुर्लक्ष करतात. पण, बाॅबसारखी खूप कमी माणसं असतील, जी राहिलेल्या गोष्टींबद्दल फक्त खंतावत न बसता आयुष्य जेव्हा संधी देईल तेव्हा ती पूर्ण करण्यासाठी पाऊल उचलतात. बाॅब यांना ती संधी नव्वदीत मिळाली आणि त्यांनी त्या संधीची पदवी करून दाखवली.
रॉबर्ट उर्फ बॉब बोन्होम. वय ९०. मुक्काम अमेरिकेतील मिशिगन राज्यातील पोर्टेज या शहरात. सेवानिवृत्त सैन्याधिकारी असलेल्या बाॅब यांना आपलं शिक्षण पूर्ण झालं नाही, आपल्याला पदवी मिळवता आली नाही याची खंत वाटत होती. घरच्या नाजूक आर्थिक परिस्थितीमुळे बॉब यांना शिक्षण अर्धवट सोडून घरची जबाबदारी घ्यावी लागली. घर चालवण्यासाठी ते शिक्षण सोडून लष्करात दाखल झाले. लष्करातून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी घराप्रतिच्या इतर जबाबदाऱ्या उचलल्या. त्याही करून झाल्यावर खरं तर त्यांना आयुष्यातल्य सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्याचं समाधान वाटायला हवं होतं; पण तसं न वाटता त्यांना आपल्या अर्धवट शिक्षणाची खंत बोचू लागली. लहानपणी पोर्टेज शहरातील सेंट ऑगस्टाइन शाळेत ते शिकत होते. पण वयाच्या १९ व्या वर्षी आर्मीत दाखल होण्यासाठी त्यांना शिक्षण अर्धवट सोडावं लागलं. पदवी मिळवण्याची त्यांची इच्छा अपुरीच राहिली. सैन्यात दाखल झाल्यावर कोरियन युद्धात ते १४ महिने लढले.
सैन्यातून सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी पैसे मिळवण्यासाठी पेपर मिलमध्ये काम करण्यास सुरुवात केली. तिथे त्यांनी ४० वर्षं काम केलं. आपल्या चार मुलांना लहानाचं मोठं केलं. सैन्यात होते तेव्हा किंवा सेवानिवृत्तीनंतर कराव्या लागलेल्या इतर नोकऱ्यांच्या काळात त्यांना आपलं अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी कधी वेळच मिळाला नाही. ११ वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले. एकदा सुनेबरोबर (डायना) जेवण करत असताना असाच विषय निघाला. सुनेने बाॅबला तुम्हाला आयुष्यात कसली खंत वाटते, असा प्रश्न सहज म्हणून विचारला. तेव्हा त्यांनी आपण शिक्षण पूर्ण करू शकलो नाही याची खंत वाटते हे सांगितलं. डायनानं बाॅबला विचारलेला प्रश्न जरी सहज होता तरी उत्तर देताना बाॅबच्या डोळ्यात शिक्षणाचं नाव काढल्यावर एक चमक दिसली. आपल्या सासऱ्यांना शिक्षण पूर्ण न झाल्याची फक्त खंतच वाटत नाहीये तर त्यांची ते पूर्ण करण्याची इच्छाही डायनाला बाॅबच्या चेहऱ्यावर वाचता आली.
डायनानेही बाॅबची ही इच्छा मनावर घेतली. सासऱ्यांना राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठीचं पाठबळ आपण द्यायला हवं याची जाणीव झाली. डायना पोर्टेजमधील पब्लिक स्कूलमध्ये अधीक्षक म्हणून कार्यरत होती. तिने त्या शाळेच्या मदतीने आपल्या सासऱ्यांना राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्यासाठीचं सहकार्य मिळवून दिलं. अभ्यास करताना अभ्यासासाठीचे संदर्भ काढून देण्यात डायनाने बाॅबला मदत केली. बाॅबने रीतसर अभ्यास पूर्ण केला, परीक्षा दिली आणि परीक्षेत बाॅब उत्तीर्णही झाले. नव्वदीत शिक्षण पूर्ण करून पदवी मिळवलेल्या बाॅब यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. काही दशकांपूर्वी कुटुंब, देशसेवा यासाठी आपल्या स्वप्नांचा, इच्छेचा त्याग केलेल्या बाॅब यांना पदवी देताना आपल्याला आनंद होत असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. या कार्यक्रमाला उपस्थित लोकदेखील बाॅब यांच्या इच्छाशक्तीने आणि प्रयत्नांनी भारावून गेले होते.
सुनेने मनावर घेतलं म्हणून शिक्षण पूर्ण करण्याची संधी आपल्या आयुष्यात चालून आल्याचं बाॅब म्हणतात. नव्वदीत का होईना पण शिक्षण स्वप्न पूर्ण झाल्याने बॉब आनंदित आहेतच. पण त्यांच्या सोबतच त्यांची चार मुलं, सुना, नातवंडे असं अख्खं कुटुंब आनंदात आहे. बाॅब यांचं स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद कुटुंबाप्रमाणे बाॅब यांचे नातेवाईक, मित्र-मैत्रिणींना आणि हितचिंतकांनाही वाटतो आहे. राहिलेलं शिक्षण पूर्ण करताना बाॅब यांनी आपलं वय आडवं येऊ दिलं नाही आणि या वयात पदवी मिळवून काय करायचं आहे असं म्हणत त्यांच्या कुटुंबानेही खोडा घातला नाही.
सुनेचा पाठपुरावा, सासऱ्याची जिद्द
बॉब यांच्या सुनेने शाळेतल्या अधिकाऱ्यांना आपले सासरे जरी जास्त शिकलेले नसले तरी ते हुशार आहेत आणि आता या वयातही जिद्दीने शिक्षण पूर्ण करू शकतात ही गोष्ट पटवून दिली. त्यांनी सैन्यातून निवृत्त झाल्यावरही नोकरी केली, बदलते तंत्रज्ञान आत्मसात केले, शिक्षणात कायम रुची ठेवली, त्यामुळे या वयातही ते आपलं राहिलेलं शिक्षण पूर्ण करू शकतात याची हमी डायनाने दिल्याने शिक्षण संस्थेतील अधिकाऱ्यांनीही बाॅब यांना आपल्या संस्थेतून परीक्षा देण्यास परवानगी दिली.