ट्रम्प मंत्रिमंडळात बॉबी जिंदाल यांचा समावेश?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2016 01:41 AM2016-11-14T01:41:44+5:302016-11-14T01:41:44+5:30
ल्युईसियानाचे दोन वेळा गव्हर्नरपद भूषविलेले आणि भारतीय-अमेरिकन बॉबी जिंदाल (४५) यांची नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे.
वॉशिंग्टन : ल्युईसियानाचे दोन वेळा गव्हर्नरपद भूषविलेले आणि भारतीय-अमेरिकन बॉबी जिंदाल (४५) यांची नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे. तसेच अमुल थापर यांना सर्वोच्च न्यायालयात न्यायमुर्तीपदाची संधी मिळू शकते.
संभाव्य मंत्र्यांच्या यादीत जिंदाल यांचे नाव असून त्यांना तशी संधी मिळाली तर अध्यक्षांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळवणारे ते पहिले आणि अमेरिकन काँग्रेसवर निवडून गेलेले दुसरे भारतीय- अमेरिकन असतील.
‘वॉल स्ट्रीट जर्नल’ ने दिलेल्या वृत्तानुसार जिंदाल यांच्यासोबत बेन कार्सन यांचाही आरोग्यमंत्री म्हणून विचार होत आहे. जिंदाल यांचे नाव ‘पॉलिटिको’ यादीतही असले तरी ट्रम्प प्रशासनाच्या संभाव्य मंत्रिमंडळाच्या बझफीड यादीत मात्र दिसत नाही. जिंदाल व कार्सन हे दोघेही रिपब्लिकन पक्षातर्फे अध्यक्षपदासाठीचे इच्छूक माजी उमेदवार आहेत. अध्यक्षपदाच्या शर्यतीतून जिंदाल बाद झाल्यावर त्यांनी सिनेटर टेड क्रूझ यांना तर कार्सन यांनी ट्रम्प यांना पाठिंबा दिला होता.
जिंदाल यांनी मंत्रिमंडळातील संभाव्य समावेशावर काहीही भाष्य करण्यास नकार दिला. मात्र कार्सन यांचा मंत्रिमंडळात समावेश जवळपास निश्चित आहे. (वृत्तसंस्था)