१८१ प्रवाशांचे मृतदेह सापडले
By admin | Published: July 18, 2014 11:04 PM2014-07-18T23:04:49+5:302014-07-18T23:04:49+5:30
अॅमस्टरडमहून क्वालालंपूरकडे जाणारे मलेशियन एअरलाईन्सचे एमएच- १७ हे विमान गुरुवारी रात्री रशियाच्या सीमेलगत युक्रेनमध्ये कोसळले होते
क्वालालंपूर/ कीव : दुर्घटनाग्रस्त मलेशियन एअरलाईन्सच्या विमानाच्या अवशेषातून १८१ प्रवाशांचे मृतदेह हाती लागले असून रशियनसमर्थक युक्रेनच्या बंडखोरांनी दुर्घटनास्थळी या विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडल्याचा दावा केला आहे. आकाशातून आग ओकत हे विमान कोसळले. या दुर्घटनेने मलेशियासोबत अवघे जग हादरले. निष्पाप लोकांचा बळी घेणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा ठोठावली जावी, अशी मागणी मलेशियाचे पंतप्रधान नजीब रजाक यांनी केली आहे.
अॅमस्टरडमहून क्वालालंपूरकडे जाणारे मलेशियन एअरलाईन्सचे एमएच- १७ हे विमान गुरुवारी रात्री रशियाच्या सीमेलगत युक्रेनमध्ये कोसळले होते. या भीषण दुर्घटनेत विमानातील सर्व २९८ प्रवासी ठार झाले. रडारवरून दिसेनासे झाल्यानंतर हे विमान रशियनसमर्थक युक्रेनी बंडखोराचा कब्जा असलेल्या शाकर्तास्क शहरालगत कोसळले.
या विमानाचा ब्लॅक बॉक्स तपासणीसाठी मॉस्कोला पाठविण्याबाबत रशियासमर्थक बंडखोर विचार करीत आहेत. पूर्व युक्रेनच्या अत्यंत दुर्गम भागात हे विमान १० हजार मीटर उंचीवरून कोसळले. ज्या ठिकाणी हे विमान कोसळले, त्या भागातील विस्तीर्ण शेतीत या विमानाचे अवेशष जागोजागी विखुरले होते. या अवशेषात छिन्न-विच्छिन्न, तर काही जळून खाक झालेल्या स्थितीत १८१ मृतदेह आढळले. ओळख पटविण्यासाठी हे मृतदेह खारकीव येथे नेण्यात येणार आहेत. दुर्घटनास्थळाच्या उत्तरेला २७० किलोमीटर अंतरावर खारकीव शहर आहे. युक्रेन सरकार व रशियनसमर्थक बंडखोर या दुर्घटनेबद्दल एक दुसऱ्यांना जबाबदार ठरवीत आहेत.