बेपत्ता मुलांचे मृतदेह इस्रायलला सापडले
By admin | Published: July 2, 2014 03:52 AM2014-07-02T03:52:39+5:302014-07-02T03:52:39+5:30
इस्रायलच्या तीन बेपत्ता किशोरवयीन मुलांचे मृतदेह पश्चिम किनारपट्टीच्या दक्षिण भागातील एका कब्रस्तानात आढळून आले आहेत
जेरुसलेम : इस्रायलच्या तीन बेपत्ता किशोरवयीन मुलांचे मृतदेह पश्चिम किनारपट्टीच्या दक्षिण भागातील एका कब्रस्तानात आढळून आले आहेत. या मुलांचे दोन आठवड्यांपूर्वी अपहरण झाले होते.
अपहरण आणि हत्याकांडामागे पॅलेस्टिनी संघटना हमासचा हात असून याची हमासला किंमत मोजावी लागेल, असा इशारा इस्रायलने दिला आहे. गिलाड शाइर, नफ्ताली फ्रँकेल व इयाल यिफराह यांचे मृतदेह इस्रायली लष्कराला सोमवारी आढळून आले. ही मुले १७ दिवसांपूर्वी हेब्रालच्या एका गावातून बेपत्ता झाली होती. या मुलांच्या शोध मोहिमेदरम्यान ४५० हून अधिक नागरिकांना अटक करण्यात आली, तर चकमक उडून पाच पॅलेस्टाईन नागरिक मारले गेले. (वृत्तसंस्था)
अपहरणानंतर लगेच या मुलांना गोळ्या घालण्यात आल्या होत्या, असे इस्रायली लष्कराने सांगितले. मुलांचे मृतदेह सापडल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी या विषयावर मंत्रिमंडळाची आपत्कालीन बैठक बोलावली होती. बैठकीनंतर ते म्हणाले, या घटनेस हमास जबाबदार असून याची हमासला किंमत मोजावी लागेल. सैतानांनी थंड डोक्याने या मुलांचे अपहरण करून त्यांची हत्या केली. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी या हत्याकांडाचा निषेध करताना दोन्ही पक्षांना संयम पाळण्याचे आवाहन केले आहे.
गाझातून नव्याने झालेल्या रॉकेट हल्ल्यामागे हमासचा हात असल्याचे सांगत नेतन्याहू यांनी मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी सुरक्षा परिषदेची बैठक बोलावली होती. हमासने या घटनेतील सहभाग स्वीकारला नाही, तसेच त्याचा इन्कारही केलेला नाही.