दूतावासाच्या वाहनातून नेला खशोगींचा मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 04:25 AM2018-10-22T04:25:33+5:302018-10-22T04:25:39+5:30
पत्रकार जमाल खशोगी यांना सौदी अरेबियाच्या दूतावासात ठार मारण्यात आले व दुसऱ्याच व्यक्तीला त्यांच्यासारखे कपडे घालून बाहेर पाठविण्यात आले.
इस्तंबूल : पत्रकार जमाल खशोगी यांना सौदी अरेबियाच्या दूतावासात ठार मारण्यात आले व दुसऱ्याच व्यक्तीला त्यांच्यासारखे कपडे घालून बाहेर पाठविण्यात आले. त्यानंतर त्यांचा मृतदेह गालिचामध्ये घालून दूतावासाच्या गाडीतून नेण्यात आला व त्याची विल्हेवाट लावण्यासाठी एका स्थानिक नागरिकाकडे देण्यात आला, तसेच दूतावासातून या घटनेचे नामोनिशाण मिटवण्याचे काम फॉरेन्सिकतज्ज्ञांनी केले, असे सौदी अरेबियाच्या अधिका-याने सांगितले.
सौदी अरेबिया शासनाचे टीकाकार व पत्रकार खशोगी यांच्या मृत्यूबाबत देण्यात आलेल्या माहितीबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण समाधानी नसल्याचे म्हटले आहे. तथापि, जगभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असताना आखाती देशाबरोबरचा ११० अब्ज डॉलरचा शस्त्रकरार रद्द करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
>युरोपीय संघाकडून तपासाची मागणी
ब्रसेल्स : युरोपीन संघाने खोलवर जाऊन तपास करण्याची मागणी केली. हत्येला जबाबदार असणा-यांवर कारवाई झाली पाहिजे, असेही म्हटले आहे. फ्रान्स व जर्मनी या सदस्य देशांनी खशोगी यांच्या हत्येचा निषेध केलेला असताना आता युरोपीय संघानेही हा विषय उचलून धरला आहे.