लादेनचा मृतदेह समुद्रात सोडला
By Admin | Published: October 8, 2014 02:27 AM2014-10-08T02:27:26+5:302014-10-08T02:27:26+5:30
अमेरिकी विशेष दलांनी अल-काइदाप्रमुख ओसामा बिन लादेनचा पाकिस्तानच्या अबोटाबाद शहरात खात्मा केल्यानंतर त्याचा मृतदेह ३०० पौंड वजनाच्या लोखंडी साखळ्या असलेल्या बॅगेमध्ये ठेवून समुद्रात टाकण्यात आला
वॉशिंग्टन : अमेरिकी विशेष दलांनी अल-काइदाप्रमुख ओसामा बिन लादेनचा पाकिस्तानच्या अबोटाबाद शहरात खात्मा केल्यानंतर त्याचा मृतदेह ३०० पौंड वजनाच्या लोखंडी साखळ्या असलेल्या बॅगेमध्ये ठेवून समुद्रात टाकण्यात आला, असे अमेरिकेचे माजी संरक्षणमंत्री लिओन पॅनेट्टा यांनी म्हटले आहे.
लादेनच्या खात्म्यानंतर ठरल्याप्रमाणे या मोस्ट वॉन्टेडचा मृतदेह नौसैनिकांनी हेलिकॉप्टरद्वारे विमानवाहू युद्धनौका ‘यूएसएस कार्ल विन्सन’वर नेला. त्यानंतर मुस्लिम रीतीरिवाजाप्रमाणे दफनविधीची तयारी करण्यात आली. अखेरीस त्याचा मृतदेह काळ्या रंगाच्या जाडजूड बॅगेत ठेवण्यात आला. या बॅगेत ३०० पौंड वजनाच्या लोखंडी साखळ्या ठेवण्यात आल्या, असे पॅनेट्टा यांनी त्यांचे नवे पुस्तक ‘वर्दि फाईट्स : अ मेम्वार आॅफ लीडरशिप इन वॉर अँड पीस’मध्ये म्हटले आहे.
लोखंडी साखळ्यांंमुळे बॅग चटकन समुद्रात बुडाली, असे पॅनेट्टा यांनी सांगितले. मात्र, त्यांनी समुद्रातील हे ठिकाण स्पष्ट केले नाही. (वृत्तसंस्था)