Boeing 720 News: नागपूरमध्ये गेल्या २४ वर्षांपासून अमेरिकेचे विमान धूळ खात होते; या मागची गोष्ट वाचाल तर...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2021 04:48 PM2021-10-15T16:48:37+5:302021-10-15T16:49:02+5:30
Boeing 720 Nagpur Airport: क्रिस कॉय (Chris Coy) नावाच्या व्यक्तीने हे विमान नागपूरमध्ये का आले, तिथेच का ठेवण्यात आले याची गोष्ट शेअर केली आहे. खरेतर त्याचे वडील हे विमान उडवत होते. तेच मेकॅनिकदेखील होते.
गेल्या 24 वर्षांपासून अमेरिकेचे एक विमान नागपूरविमानतळावर (Nagpur Airport) धूळ खात पडून होते, असे सांगितले तर कोणी विश्वास ठेवणार नाही. बोईंग 720 (Boeing 720) हे विमान 1991 मध्ये आपत्कालीन परिस्थितीमुळे लँड करण्यात आले होते. इंजिनात बिघाड झाल्याने तसे करावे लागले होते. यानंतर ते पुन्हा कधी झेपावले नाही. या विमानाची स्टोरी त्या विमानाच्या मेकॅनिकच्या मुलाने शेअर केली आहे.
क्रिस कॉय (Chris Coy) नावाच्या व्यक्तीने हे विमान नागपूरमध्ये का आले, तिथेच का ठेवण्यात आले याची गोष्ट शेअर केली आहे. खरेतर त्याचे वडील हे विमान उडवत होते. तेच मेकॅनिकदेखील होते. या घटनेसाठी त्याने आपल्या वडिलांची चूक असल्याचे म्हटले आहे. त्यांनीच हे विमान नागपूरला आणले आणि तिथेच सोडले असे तो म्हणतो. क्रिस कॉयचे वडील ब्राउन फील्ड म्युनिसिपल एयरपोर्टवर एरोप्लेन मेकॅनिक होते. ते हे विमान अमेरिकेहून घेऊन आले होते.
I just found out that
— Chris Croy (@ChrisCroy) October 12, 2021
1. For 24 years every pilot who landed at the airport in Nagpur, India had to be warned about the Boeing 720 sitting next to the runway.
2. That it was my dad's fault.
This is the story of my dad's junkyard jet. pic.twitter.com/yxw2qjLQHX
तेव्हा भारतात राहणाऱ्या सॅम वेदर यांनी क्रिसच्या वडिलांना विमान दुरुस्त करून भारतात आणण्यास सांगितले होते. तर अन्य सहकाऱ्यांनी क्रिसच्या वडिलांना ते विमान दुरुस्त करणे म्हणजे वेळ फुकट घालविणे आहे, असा सल्ला दिला होता. तरी देखील क्रिसचे वडील ते विमान दुरुस्त करून भारताकडे झेपावले.
त्यांना फक्त टेस्ट फ्लाईट करायची होती. यासाठी त्यांनी तिजुआना बॉर्टर पार केली. यासाठी क्रिसच्या आईने कागदपत्रांची पूर्तता करून परवानगी मिळविली होती. टेस्ट फ्लाईट यशस्वी झाल्यावर क्रिसचे वडील आणि सॅम वेदर हे त्या विमानाने भारताकडे निघाले. हे विमान भारतात पोहोचले परंतू ते बिघाडामुळे नागपूरमध्ये आपत्कालीन लँड करावे लागले. हे विमान नागपूर विमानतळावरून लगेचच हटविण्याचा प्रयत्न सॅमने केला. परंतू भारतातील नियमांमुळे त्यांना ती परवानगी मिळाली नाही. यामुळे त्यांना ते विमान तिथेच सोडून परतावे लागले. रनवेपासन 300 फूटांवर हे विमान नेऊन ठेवण्यात आले होते.
2015 मध्ये एक विश्वास बसणार नाही अशी घटना घडली. नागपूर विमानतळावर नवीन संचालक आले. त्यांनी या विमानाची चाके बदलण्याचा निर्णय घेतला. यानंतर विमानतळावरील ही अनेक वर्षांपासूनची अडचण अर्ध्या तासात दूर झाल्याचे क्रिसने म्हटले आहे.