नायजेरियात बोको हरामचा नरसंहार, 100 हून अधिक लोकांनावर गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 09:04 PM2024-09-04T21:04:25+5:302024-09-04T21:04:49+5:30
नायजेरियातील दहशतवादी संघटनेने शेकडो लोकांवर गोळीबार केला.
मैदुगुरी : नायजेरियात बोको हरामची दहशत वाढली आहे. बोको हरामच्या दहशतवाद्यांनी उत्तर-पूर्व नायजेरियात नरसंहार घडवल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी स्थानिक रहिवाशांनी दावा केला की, दहशतवाद्यांनी बेच्छुट गोळीबार केला, ज्यात किमान 100 गावकरी मारले गेले. पोलिसांनी सांगितले की, बोको हरामचे 50 हून अधिक दहशतवादी रविवारी संध्याकाळी मोटारसायकलवरून योबे राज्यातील तरमुवा कौन्सिल परिसरात घुसले आणि गोळीबार करुन अनेक इमारतींना आग लावली.
एकाच गावातील 34 जणांची हत्या
मृतांपैकी 34 जण एकाच गावातील होते. या हल्ल्यात आतापर्यंत 100+ गावकऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. स्थानिकांनी सांगितले की, अजून अनेकजण बेपत्ता असून, त्यांचा शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी योबेमध्ये सर्वात मोठा हल्ला झाला होता. गावकऱ्यांनी सुरक्षा दलांना दहशतवाद्यांची माहिती दिल्यामुळे हा हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
बोको हराम म्हणजे काय?
बोको हराम हा एक दहशतवादी गट आहे, ज्याची स्थापना 2002 मध्ये झाली होती. नायजेरियात शरिया कायदा लागू करणे आणि पाश्चात्य शिक्षणाला विरोध करणे, हा त्याचा उद्देश आहे. या गटाने गेल्या 10 वर्षांत हजारो लोकांचा बळी घेतला आहे, तर लाखो लोकांना आपली घरे सोडून विस्थापित व्हावे लागले आहे. बोको हरामचे हल्ले केवळ ग्रामीण भागातच नाहीत, तर शाळा आणि धार्मिक स्थळांवरही होतात.