अफगाणिस्तानच्या नंगरहार प्रांतात भीषण स्फोट, 3 जणांचा मृत्यू तर 12 जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 06:14 PM2021-11-12T18:14:13+5:302021-11-12T18:14:22+5:30
अद्याप कुठल्याच दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली नाही.
काबुल:अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील नांगरहार प्रांतातील स्पिन घर परिसरात शुक्रवारी नमाजाच्या वेळी मशिदीमध्ये मोठा बॉम्बस्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात तिघांचा मृत्यू झालाय, तर मौलवीसह 12 जण जखमी झाले आहेत. स्थानिक वेळेनुसार पहाटे 1.30 वाजता हा स्फोट झाला, असे परिसरातील एका व्यक्तीने सांगितले.
तालिबानच्या एका अधिकाऱ्याने एएफपी या वृत्तसंस्थेला या हल्ल्याला दुजोरा दिला आहे. अफगाणिस्तानच्या नांगरहार प्रांतातील मशिदीत शुक्रवारी स्फोट झाल्याची माहिती तालिबानच्या अधिकाऱ्याने दिली. त्याने सांगितले की, स्पिन घर जिल्ह्यातील मशिदीत शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी झालेल्या स्फोटात तीन नागरिकांचा मृत्यू आणि 12 जण जखमी झाले आहेत. गेल्या काही दिवसांत अफगाणिस्तानमध्ये अनेक हल्ले झाले आहेत, त्या हल्ल्यांमागे इस्लामिक स्टेटचा हात आहे. पण, या स्फोटाची जबाबदारी अद्याप कुठल्याच संघटनेने घेतली नाही.
काबुल रुग्णालयाबाहेर स्फोट
तत्पूर्वी, अफगाणिस्तानची राजधानी काबुलमधील लष्करी रुग्णालयासमोर मंगळवारी बॉम्बस्फोट झाला होता. तालिबानचे उप प्रवक्ते बिलाल करीमी यांनी असोसिएटेड प्रेसला सांगितले की, काबुलमधील सरदार मोहम्मद दाऊद खान मिलिटरी हॉस्पिटलच्या बाहेर नागरिकांना लक्ष्य करणारा स्फोट घडवून आणण्यात आला. त्या हल्ल्यात 25 जणांचा मृत्यू झाला, तर 50 जण जखमी झाले. सरदार मोहम्मद दाऊद खान रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर हा स्फोट झाला. इस्लामिक स्टेटच्या सैनिकांनी रुग्णालयाबाहेरही गोळीबारही केला.
ऑक्टोबरमध्ये शिया मशिदीत स्फोट
मागच्या महिन्यात उत्तर अफगाणिस्तानमधील शिया मुस्लिम उपासकांनी भरलेल्या मशिदीत 8 ऑक्टोबर रोजी झालेल्या स्फोटात किमान 46 लोक ठार आणि डझनभर जखमी झाले होते. इस्लामिक स्टेट (IS) या दहशतवादी संघटनेने मशिदीवरील बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्वीकारली असून त्यांच्या आत्मघातकी हल्लेखोराने ही घटना घडवून आणल्याचे सांगितले.