इराकमध्ये बॉम्बस्फोटमालिका, २५ ठार ८० जखमी

By admin | Published: May 13, 2014 07:00 PM2014-05-13T19:00:44+5:302014-05-14T03:16:58+5:30

इराकमधील निवडणुकीनंतर राजधानीला हादरवून सोडणारी पहिली बॉम्बस्फोट मालिका घडवत मंगळवारी दहशतवाद्यांनी २५ नागरिकांचा बळी घेतला.

A bomb blast in Iraq, 25 dead, 80 injured | इराकमध्ये बॉम्बस्फोटमालिका, २५ ठार ८० जखमी

इराकमध्ये बॉम्बस्फोटमालिका, २५ ठार ८० जखमी

Next

बगदाद : इराकमधील निवडणुकीनंतर राजधानीला हादरवून सोडणारी पहिली बॉम्बस्फोट मालिका घडवत मंगळवारी दहशतवाद्यांनी २५ नागरिकांचा बळी घेतला.
इराकमध्ये गेल्या महिन्यात निवडणूक झाली होती. अमेरिकी सैन्यदले मायदेशी परतल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक होती.
बगदादमधील शियाबहुल भागांना लक्ष्य बनवून गर्दीच्या वेळी हे स्फोट घडविण्यात आले असून, यात ८० जण जखमी झाले आहेत. इराकमध्ये यंदाच्या हिंसाचारात आतापर्यंत ३ हजार ३०० जणांचा बळी गेला आहे.
यावर्षी वाढलेल्या हिंसाचारास सरकारने सिरियात सुरू असलेल्या यादवीसारख्या बाह्य घटकांना जबाबदार ठरवले आहे. मात्र, अल्पसंख्याक सुन्नी समुदायाच्या असंतोषातून हे हल्ले होत असल्याचे राजकीय विश्लेषक व मुत्सद्यांचे म्हणणे आहे. सरकारने या समुदायाला संतुष्ट करण्यासाठी काही ठोस पावले उचलायला हवीत, असे त्यांना वाटते.
बगदाद शहरात सकाळी एकूण नऊ बॉम्बस्फोट झाले. त्यातील दोन पूर्वेकडील बलादियात भागातील वाहतूक पोलीस मुख्यालयाजवळ घडविण्यात आले. याशिवाय. सद्र, उर्र जमिला, मामल आणि कर्राडा हे भागही बॉम्बस्फोटांनी हादरले. अरब जुबौर या सुन्नीबहुल भागातही एक बॉम्बस्फोट झाला. यात तीन जण ठार झाले. याशिवाय पश्चिमेकडे एका पोलीस गस्ती पथकाला लक्ष्य करून रस्त्याच्या कडेला स्फोट घडविण्यात आला. यात एकाचा बळी गेला. राजधानीतील अनेक भागातून धुराचे लोट उठताना दिसत होते. अनेक दुकानांच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले असून, नजीकच्या कार सांगाड्यात रूपांतरित झाल्याची माहिती पत्रकारांनी दिली. कर्राडा शहरातील एका गॅरेजमध्ये स्फोट होऊन तीन जण ठार झाले. एक दहशतवादी ग्राहक बनून गॅरेजमध्ये आला होता. तो कार गॅरेजमध्ये उभी करून निघून गेला. या कारमध्ये स्फोटके होती. त्यांचा नंतर स्फोट झाला, अशी माहिती गॅरेज मालक अबु नुर्री यांनी दिली. स्फोट झाला तेव्हा माझा केवळ एकच कर्मचारी गॅरेजमध्ये होता. तो खाली कोसळला. गॅरेजमध्ये सर्वत्र धुरच धूर झाला होता. अनेक लोक रडत होते, तर इतर बाहेर पळत होते, असेही नुर्री म्हणाले. देशाच्या उत्तर भागात झालेल्या रॉकेट हल्ल्यामध्ये एक तरुण मुलगा मृत्युमुखी पडला. कोणत्याही गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

Web Title: A bomb blast in Iraq, 25 dead, 80 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.