बँकॉकमध्ये ब्रह्मदेवाच्या मंदीराजवळ बाँबस्फोट, २७ ठार
By admin | Published: August 17, 2015 06:51 PM2015-08-17T18:51:53+5:302015-08-17T20:04:34+5:30
थायलंडमधील सेन्ट्रल बँकॉकच्या व्यापारी केंद्रांनी गजबजलेल्या परीसरात एक शक्तिशाली बाँबस्फोट झाला आहे. मोटरसायकलवर ठेवलेल्या या बाँबच्या स्फोटात २७ जण ठार झाल्याचे
Next
ऑनलाइन लोकमत
बॅंकॉक (थायलंड), दि - १७ - थायलंडमधील सेन्ट्रल बँकॉकच्या व्यापारी केंद्रांनी गजबजलेल्या परीसरात इरावन मंदीराजवळ एक शक्तिशाली बाँबस्फोट झाला आहे. मोटरसायकलवर ठेवलेल्या या बाँबच्या स्फोटात १५ जण ठार झाल्याचे तर किमान १०० पेक्षा जास्तजण जखमी झाल्याचे वृत्त आहे. सोमवारी संध्याकाळी बँकॉकमधल्या इरावन मंदीराजवळ घडलेल्या या स्फोटाची अद्याप जबाबदारी कुणीही घेतलेली नसून पोलीस तपास करत आहेत. काही प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार या मंदीराच्या अत्यंत नजीक हा स्फोट झाला आहे.
यापूर्वी इतक्या मोठ्या क्षमतेचा बाँबस्फोट याआधी थायलंडमध्ये कधीही झाला नव्हता असे स्थानिक पोलीसांचे म्हणणे असून दहशतवादी कोण आहेत आणि त्यांचे नक्की लक्ष्य कोण होते हे स्पष्ट झालेले नाही. या पूर्वी बँकॉकमध्ये इस्त्रायली नागरिकांना लक्ष्य करणारे लहानमोठे स्फोट घडवण्यात आले होते, मात्र इतका शक्तिशाली स्फोट प्रथमच झाल्याचे सांगण्यात येत आहे.
इरावन मंदीर हे ब्रह्मदेवाचे १४ व्या शतकात बांधण्यात आलेले प्राचीन मंदीर असून हिंदूसह हजारोच्या संख्येने बुद्ध धर्मीयही या मंदीरात दर्शनासाठी येत असतात. या बाँबस्फोटात मंदीरात आलेल्या भाविकांना मोठ्या प्रमाणावर इजा झाली असून परीसरात प्रचंड प्रमाणात गोंधळाचे वातावरण आहे. या मंदीराजवळच दोन मॉल असून स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी सातच्या सुमारास ही घटना घडल्यामुळे परीसरात खूप गर्दी होती.
या परीसरात आणखी एक बाँब पेरलेला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला असून त्यादृष्टीने तपास करण्यात येत असून हा परीसर रिकामा करण्यात आला आहे. बाँबस्फोटात अनेक वाहनेही जळली जवळपास ४० वाहनांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. पर्यटकांनी गजबजलेल्या या परीसरात दहशतीचे वातावरण आहे. अनेक भारतीय पर्यटक ही घटना घडली तेव्हा या परीसरात होते. अनेकांनी सोशल मीडियावरून या स्फोटाची कल्पना दिली असून नशीबाने वाचल्याची बातमी आप्तेष्टांना दिली आहे.
घटनास्थळी अभिनेत्री जेनेलिया डिसुजा-देशमुख...
ज्यावेळी बॉम्बस्फोट झाला त्यावेळी अभिनेता रितेश देशमुख यांची पत्नी अभिनेत्री जेनेलिया डिसुजा-देशमुख येथील एका मॉलमध्ये उपस्थित असल्याचे ट्विट केले आहे. मॉलमध्ये असताना बॉम्बस्फोटाचा मोठा आवाज एेकला असून आम्ही सुखरुप आहोत, पण यामध्ये ज्यांनी आपला जीव गमवाला त्यांचे फार वाईट वाटते, असे ट्विटरवर जेनेलियाने म्हटले आहे.