निर्वासितांवर चूकून टाकला बॉम्ब; १०० ठार
By admin | Published: January 18, 2017 05:15 AM2017-01-18T05:15:55+5:302017-01-18T05:15:55+5:30
बोको हराम दहशतवाद्यांविरुद्धच्या मोहिमेवर असलेल्या हवाई दलाच्या लढाऊ विमानाने चुकून निर्वासितांच्या छावणीवर बॉम्बफेक केली.
मैदुगिरी : बोको हराम दहशतवाद्यांविरुद्धच्या मोहिमेवर असलेल्या हवाई दलाच्या लढाऊ विमानाने चुकून निर्वासितांच्या छावणीवर बॉम्बफेक केली. यात १०० ठार, तर मदत कार्यकर्त्यांसह अनेक जखमी झाले. जखमींना रुग्णालयात हलविण्यासाठी बोर्नो राज्य सरकारचे अधिकारी प्रयत्न करीत आहेत, असे एका सरकारी अधिकाऱ्याने मंगळवारी नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर सांगितले.
ईशान्य भागातील हवाई हल्ल्यात सामान्य नागरिक ठार झाल्याच्या तक्रारी स्थानिकांनी यापूर्वी अनेकदा केल्या होत्या. तथापि, नायजेरियन लष्कराने नागरिकांवर चुकून हल्ला झाल्याची कबूली देण्याची ही पहिलीच वेळ आहे. ईशान्य रण भागात अपघाताने बॉम्बहल्ला झाल्याच्या वृत्तास लष्करी कमांडर मेजर जनरल लकी इराबोर यांनी दुजोरा दिला आहे. जखमींत डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर्स आणि इंटरनॅशनल कमिटी आॅफ द रेड क्रॉससाठी काम करणाऱ्या नायजेरियन नागरिकांचा समावेश आहे, असेही ते म्हणाले.
बोको हरामचे दहशतवादी गोळा होणार असल्याची माहिती मिळाल्याच्या आधारे आपण हल्ल्याचे आदेश दिले होते. हवाई दल जाणिवपूर्वक नागरिकांना लक्ष्य करीत नाही. तथापि, या हल्ल्याची आम्ही चौकशी करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)