शियांच्या मिरवणुकीवर बांगलादेशात बॉम्बहल्ला
By admin | Published: October 25, 2015 04:03 AM2015-10-25T04:03:24+5:302015-10-25T04:03:24+5:30
बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये दरवर्षी निघणाऱ्या आशुरा मिरवणुकीत अल्पसंख्याक शिया समुदायाचे हजारो लोक जमा झाले असताना बॉम्बहल्ला करण्यात आला. यात १२ वर्षीय
ढाका : बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये दरवर्षी निघणाऱ्या आशुरा मिरवणुकीत अल्पसंख्याक शिया समुदायाचे हजारो लोक जमा झाले असताना बॉम्बहल्ला करण्यात आला. यात १२ वर्षीय मुलगा ठार झाला असून, ९० जण जखमी झाले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेटने (इसिस) स्वीकारली आहे.
मिरवणुकीत २० हजारांहून अधिक लोक सहभागी झालेले असताना शुक्रवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास तीन बॉम्ब फेकण्यात आले. हुसैनी दालान हे शिया समुदायासाठी १७ व्या शतकातील महत्त्वपूर्ण अध्ययन केंद्र असून, तेथेच हा हल्ला करण्यात आला. स्फोट होताच जमावातील लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले. अरुंद गल्ल्यांमध्ये शेकडो लोक घुसल्यामुळे चेंगराचेंगरी झाली व त्यामुळे अनेक जण जखमी झाले. या घटनेनंतर बॉम्बस्फोटाच्या ठिकाणी तातडीने अधिक सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली. जवानांनी लोकांना तेथून बाहेर पडण्यास मदत केली.
यावर्षी देशात हिंसाचाराच्या घटना वाढल्या असून, त्यांची जबाबदारी इस्लामिक स्टेट या अतिरेकी संघटनेने स्वीकारली आहे. महिनाभरातील हा तिसरा हल्ला आहे. यापूर्वी इटालियन कामगार व जपानी शेतकऱ्यावर हल्ला करण्यात आला होता. तथापि, हा हल्ला अंतर्गत गटांनी केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. लोकांत भीती पसरविण्यासाठी व अस्थिरतेचे वातावरण तयार करण्यासाठी हा हल्ला करण्यात आला आहे, असे पोलिसांनी म्हटले होते.
पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, फेकण्यात आलेला एक बॉम्ब मुलाच्या अंगावर पडला व त्याचा जागीच मृत्यू झाला. जखमींना सरकारी रुग्णालयांत दाखल करण्यात आले असून, बहुतांश लोकांची प्रकृती धोक्याबाहेर आहे, असे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. (वृत्तसंस्था)