निवडणुकीचा अंदाज चुकल्याने खावे लागले पुस्तक
By admin | Published: June 15, 2017 12:49 AM2017-06-15T00:49:57+5:302017-06-15T00:49:57+5:30
निवडणुकीबाबतचा अंदाज खोटा ठरल्यानंतर ब्रिटनमधील लेखकाला टीव्हीवरील लाइव्ह शोमध्ये आपले नवे पुस्तक खाण्याची वेळ आली.
लंडन : निवडणुकीबाबतचा अंदाज खोटा ठरल्यानंतर ब्रिटनमधील लेखकाला टीव्हीवरील लाइव्ह शोमध्ये आपले नवे पुस्तक खाण्याची वेळ आली. त्याचे झाले असे की, लेखक मॅथ्यू गुडविन यांनी लेबर पक्षाला किती मते मिळतील याबाबत २८ मे रोजी टिष्ट्वटरवर अंदाज व्यक्त केला होता. जेरेमी कोरबिन यांच्या लेबर पक्षाला ३८ टक्क्यांहून अधिक मते मिळणार नाहीत. जर माझा हा अंदाज खोटा ठरला तर मी माझे नवे पुस्तक ‘ब्रेक्सिट’ खाईन, असे टष्ट्वीट मॅथ्यू यांनी केले होते. तथापि, मतदारांनी त्यांचा अंदाज खोटा ठरविला. सार्वत्रिक निवडणुकीत लेबर पक्षाने ४०.३ टक्के मते मिळवली. निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वांच्या नजरा मॅथ्यू यांच्यावर खिळल्या. कारण, त्यांचा अंदाज चुकला होता. विजयानंतर लेबर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी समाजमाध्यमावर मॅथ्यू यांना ट्रोल करणे सुरू केले. त्यामुळे मॅथ्यू यांना पुस्तक खाण्याचा आपला शब्द पाळावा लागला. लेबर पक्ष जिंकला मी हरलो, त्यामुळे आपण टीव्हीवर लाइव्ह शोमध्ये पुस्तक खाणार आहोत, असे टष्ट्वीट त्यांनी १० जून रोजी केले. या टष्ट्वीटनंतर ते ब्रेक्झिट पुस्तकासह स्काय चॅनलच्या केंद्रात गेले. चॅनलवर निवडणुकीच्या निकालाबाबत चर्चा करताना त्यांनी पुस्तकाचे एक पान फाडून खाल्ले. मॅथ्यू हे केंट युनिव्हर्सिटीत राज्यशास्त्राचे प्रोफेसर आहेत.