मार्गारेट अ‍ॅटवूड, बर्नार्डिन इव्हारिस्टोंना बुकर पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 04:48 AM2019-10-16T04:48:03+5:302019-10-16T04:48:34+5:30

दोन महिलांचा सन्मान : नियमाला वळसा घालून केली निवड

Booker Prize to Margaret Atwood, Bernardine Evariston | मार्गारेट अ‍ॅटवूड, बर्नार्डिन इव्हारिस्टोंना बुकर पुरस्कार

मार्गारेट अ‍ॅटवूड, बर्नार्डिन इव्हारिस्टोंना बुकर पुरस्कार

Next

लंडन : जागतिक परंपरांनी तयार केलेले नियम मोडण्यात आघाडीवर असणाऱ्या स्त्रियांनी आता प्रतिष्ठेच्या साहित्य पुरस्कारांनाही परंपरेची कुंपणे तोडणे भाग पाडले असून, ख्यातनाम कॅनेडियन लेखिका मार्गारेट अ‍ॅटवूड आणि अँग्लो नायजेरियन वंशाच्या ब्रिटिश लेखिका बर्नार्डिन इव्हारिस्टो या दोघींनी मिळून यंदाच्या मॅन बुकर पुरस्कारावर आपले नाव संयुक्तपणे कोरले आहे.


एकोणऐंशी वर्षे वयाच्या मार्गारेट अ‍ॅटवूड यांची ‘द टेस्टामेंटस्’ ही बहुचर्चित कादंबरी ‘बुकर’ची मानकरी ठरली आहे. बर्नार्डिन इव्हारिस्टो यांच्या ‘गर्ल, वूमन, अदर’ कादंबरीलाही ‘बुकर’ मिळाले आहे. बुकर पुरस्काराच्या पन्नासाव्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात दोन्ही लेखिकांना पन्नास हजार पौंडांचा हा पुरस्कार विभागून देण्यात येणार आहे.


खरे तर बुकर विभागून दिले जाऊ नये, असा नियम आहे. ‘आम्ही पुष्कळ चर्चा केली; पण या दोघींपैकी कुणाही एकीचे नाव वगळू नये, या निर्णयावर आम्ही ठाम होतो. नियमाला वळसा घालण्यास तयार नसलेल्या बुकर समितीला अखेर आम्ही माघार घेण्यास भाग पाडले. कारण या दोन्ही लेखिकांचे काम सारख्याच तोलाचे आहे,’ अशी प्रतिक्रिया परीक्षक मंडळाच्या वतीने पीटर प्लॉरेन्स यांनी व्यक्त केली.


‘आम्हा कॅनेडियन लोकांना प्रसिद्धीचा झोत अवघडूनच टाकतो. त्यामुळे माझ्या बरोबरीने बर्नार्डिनलाही हा मान मिळतो आहे, हे छान झाले,’ अशी मिश्कील भावना मार्गारेट अ‍ॅटवूड यांनी व्यक्त केली. हा मानाचा पुरस्कार दोनदा मिळविणाºया अ‍ॅटवूड यांना २००० साली ‘द ब्लाइंड असासिन’ या कादंबरीसाठी बुकर मिळाले होते. त्याआधी १९८५ साली ‘द हँडमेडस् टेल’ या त्यांच्या कादंबरीला बुकरचे नामांकन होते. पर्यावरणवादी चळवळीत अग्रणी असलेल्या अ‍ॅटवूड यांनी खांद्यावर ‘एक्स्टिंक्शन रिबेलियन’ संस्थेचे चिन्ह लावूनच बुकर स्वीकारले. अ‍ॅटवूड यांची ‘द टेस्टामेंटस्’कादंबरी त्यांच्या ‘द हॅण्डमेडस् टेल’ कादंबरीचाच पुढचा भाग असून, त्यात विभिन्न पार्श्वभूमी असलेल्या तीन स्त्रियांचे आयुष्य रेखाटले आहे.


‘बुकर मिळवणारी मी पहिली कृष्णवर्णीय स्त्री आहे. आमच्या कहाण्या आम्हीच नाही लिहिल्या, तर त्या कधीही सांगितल्याच जाणार नाहीत, हे मला माहीत आहे,’ असे सांगून बर्नार्डिन इव्हारिस्टो यांनी जागतिक साहित्य-व्यवहारातल्या वंशवादावर नेमके बोट ठेवले. या पुरस्काराबरोबर जे पैसे मिळतील, त्यातून माझी कर्जे एकदाची फिटतील आणि मी स्वतंत्र होईन, असेही त्या म्हणाल्या.
‘गर्ल, वूमन, अदर’ ही कादंबरी आफ्रिकन वंशाच्या एकूण बारा ब्रिटिश स्त्रियांच्या कहाण्या एकत्र गुंफून एक विलक्षण अस्वस्थ अनुभव वाचकाला देते, असा गौरव निवड समितीने केला आहे. (वृत्तसंस्था)

१५१ साहित्यकृतींचा विचार
यंदा १५१ साहित्यकृतींचा विचार करण्यात आला, तसेच बुकर पुरस्कारासाठी भारतीय वंशाचे लेखक सलमान रश्दी यांच्यासह सहा लेखकांच्या कादंबºया अंतिम फेरीत पोहोचल्या होत्या. त्यात चार स्त्रिया होत्या आणि त्या चार वेगवेगळ्या खंडांत जन्मलेल्या आहेत, हे विशेष! सलमान रश्दी यांच्या ‘द मिडनाइटस् चिल्ड्रन’ला १९८१ साली बुकर पुरस्कार मिळाला होता.

Web Title: Booker Prize to Margaret Atwood, Bernardine Evariston

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.