सीमेवरील शांततेला प्राधान्य द्यायला हवे; PM मोदी यांनी जिनपिंग यांच्यासमोर व्यक्त केली अपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 08:34 AM2024-10-24T08:34:53+5:302024-10-24T08:35:55+5:30

संयुक्त राष्ट्रसंघातील चीनच्या भूमिकेवर काढले अप्रत्यक्ष चिमटे; ब्रिक्स परिषदेत सहकार्यावर भर

Border peace should be prioritized; Prime Minister Modi expressed his hope to Xi Jinping | सीमेवरील शांततेला प्राधान्य द्यायला हवे; PM मोदी यांनी जिनपिंग यांच्यासमोर व्यक्त केली अपेक्षा

सीमेवरील शांततेला प्राधान्य द्यायला हवे; PM मोदी यांनी जिनपिंग यांच्यासमोर व्यक्त केली अपेक्षा

कझान (रशिया) : दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी सर्व राष्ट्रांमध्ये एकमताने दृढ सहकार्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिपादित केली. हे आव्हान पेलण्यासाठी दुहेरी मापदंड नकोत, असेही त्यांनी निक्षून सांगितले. १६व्या ब्रिक्स शिखर परिषदेत ते बोलत होते. कट्टरवाद थांबवण्यासाठी युवकांनी सक्रिय होऊन पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मोदी म्हणाले. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, रशियाचे व्लादिमीर पुतीन, इराणचे मसूद पेजेशकियन या नेत्यांच्या साक्षीने मोदींनी दहशतवादावर हे भाष्य केले.

पाकिस्तानातील दहशतवाद्यांचा आंतरराष्ट्रीय पातळीवर यादीत समावेश करण्याच्या अनेक प्रस्तावांना संयुक्त राष्ट्रसंघात चीनने विरोध केला होता. या पार्श्वभूमीवर मोदी यांचे हे वक्तव्य महत्त्वाचे ठरते. दहशतवादासोबतच सायबर सुरक्षा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय सुरक्षिततेबाबत जागतिक नियम करण्यासाठी सहकार्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली.

  • काळानुरूप बदलाची मानसिकता

‘ब्रिक्स’बद्दल बोलताना मोदी म्हणाले, काळानुरूप बदल स्वीकारण्याची मानसिकता असलेली ही संघटना आहे. हा आदर्श इतर जागतिक संघटनांसमोर ठेवून सुधारणा घडवून आणण्यासाठी एकमताने पुढाकार घेतला पाहिजे.

 

  • युद्ध नव्हे, सुसंवाद - मुत्सद्देगिरीवर विश्वास

भारत कधीही युद्धाचे समर्थन करणार नाही. सुसंवाद आणि मुत्सद्देगिरीवरच आमच्या देशाचा विश्वास असल्याचे मोदी म्हणाले. रशिया-युक्रेन वादावर शांततापूर्ण मार्गाने तोडगा काढावा, असे आवाहन त्यांनी केले. ‘ब्रिक्स’ ही संघटना जगाला युद्ध, आर्थिक अनिश्चितता, कार्बन उत्सर्जन आणि दहशतवादासारख्या आव्हानांत योग्य मार्ग दाखवू शकते, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.

  • २०२०मधील लडाख वादानंतर प्रथमच मोदी-जिनपिंग यांच्यात औपचारिक चर्चा

बुधवारी ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. मे-२०२० मध्ये लडाखमध्ये सीमेवर दोन्ही देशांत निर्माण झालेल्या वादानंतर ही पहिलीच उच्चस्तरीय चर्चा आहे. या चर्चेआधी दोन दिवसांपूर्वी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर दोन्ही देशांच्या सैनिकांनी गस्त घालण्याबाबतच्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या असून, ही चर्चा लडाख भागात सीमेवर चार वर्षांपासून सुरू असलेला तणाव कमी होण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल मानले जात आहे.

  • पुतिन यांची भूमिका महत्त्वाची?

भारत-चीन तणाव कमी करण्याच्या कामी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. गेल्या १२ सप्टेंबर रोजी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी सेंट पीटर्सबर्गच्या विशेष दौऱ्यात पुतिन यांची भेट घेतली होती. त्यानंतर चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशीही चर्चा केली होती. लडाखबाबत चीनशी झालेला करार या भेटींचेच फलित असल्याचे मानले जाते.

 

  • कराराबाबत जनतेला विश्वासात घ्या

पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष ताबा रेषेवर गस्त घालण्यासंदर्भात चीनशी केलेल्या कराराबाबत केंद्र सरकारने जनतेला विश्वासात घ्यावे, अशी मागणी काँग्रेसने बुधवारी केली. दोन्ही देशांचे सैन्य मागे घेतल्यानंतर या सीमेवर मार्च २०२०मध्ये होती तशीच स्थिती पुन्हा प्रस्थापित होईल, अशी आशा या पक्षाने व्यक्त केली आहे. 

Web Title: Border peace should be prioritized; Prime Minister Modi expressed his hope to Xi Jinping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.