ब्रेक्झिटचे खंदे समर्थक बोरिस जॉन्सन ब्रिटनचे नवे पंतप्रधान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 05:41 PM2019-07-23T17:41:02+5:302019-07-23T17:41:47+5:30
थेरेसा मे लवकरच राजीनामा देणार
लंडन: कंझर्व्हेटिव्ह पक्षानं बोरिस जॉन्सन यांची नेतेपदी निवड केली आहे. त्यामुळे जॉन्सन ब्रिटनचे नवे पंतप्रधान असतील. जॉन्सन यांना ९२,१५३ (६६ टक्के) मतं मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार जेरेमी हंट यांना ४६,६५६ मतं मिळाली. कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या एकूण १,५९,३२० सदस्यांपैकी ८७.४ टक्क्यांनी पक्षाचा नेता निवडण्यासाठी मतदान केलं होतं.
बोरिस जॉन्सन ब्रेक्झिटचे खंदे समर्थक आहेत. यासाठी त्यांनी अभियानदेखील राबवलं होतं. जॉन्सन यांची पक्षनेतेपदी निवड झाल्यानं सध्या पंतप्रधानपद भूषवत असलेल्या थेरेसा मे त्यांचा राजीनामा राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्याकडे सोपवतील. त्याआधी त्या संसदेत पंतप्रधान म्हणून प्रश्नांचा सामना करतील. ब्रेक्झिटसाठी मतदान झाल्यानंतर डेव्हिड कॅमेरुन यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर थेरेसा मे यांनी देशाचं नेतृत्त्व केलं.
ब्रिटनच्या जनतेनं तीन वर्षांपूर्वी ब्रेक्झिटच्या बाजूनं कौल दिला. मात्र अद्यापही याबद्दलची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे ब्रेक्झिटची प्रक्रिया पूर्ण करण्याचं आव्हान जॉन्सन यांच्यासमोर असेल. विशेष म्हणजे जॉन्सन यांच्या पक्षातील परिस्थितीदेखील त्यांच्यासाठी फारशी अनुकूल नाही. जॉन्सन यांच्या नेतृत्त्वाखाली काम करण्यापेक्षा आम्ही राजीनामा देऊ, अशी भूमिका चॅन्सलर फिलिप हेमंड यांच्यासह अनेक प्रमुख कॅबिनेट मंत्र्यांनी घेतली आहे.