बोस्नियन युद्धातील आरोपीची आंतरराष्ट्रीय न्यायालयात आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2017 01:55 PM2017-11-30T13:55:27+5:302017-11-30T13:57:30+5:30
स्लोबोदान प्राल्जक असे या 72 वर्षिय गुन्हेगाराचे नाव आहे. शिक्षा कायम झाल्याचे समजताच कॅमेऱ्यांच्यासमोर लहानशा कुपीतून विष पिऊन त्याने आत्महत्या केली. रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला.
द हेग (नेदरलॅंडस)- बोस्निया-क्रोट युद्धातील गुन्हेगाराने संयुक्त राष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्येच आत्महत्या केल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. 1990 च्या दशकामध्ये बाल्कन युद्धात केलेल्या गुन्ह्यांबाबत दोषी ठरवलेल्या या गुन्हेगाराची 20 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा न्यायालयाने कायम केल्यावर त्याने भर न्यायालयात विष घेऊन आत्महत्या केली. स्लोबोदान प्राल्जक असे या 72 वर्षिय गुन्हेगाराचे नाव आहे. शिक्षा कायम झाल्याचे समजताच कॅमेऱ्यांच्यासमोर लहानशा कुपीतून विष पिऊन त्याने आत्महत्या केली. रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला.
Bosnian war criminal commits suicide in live UN court drama https://t.co/p1yNpW8kGdpic.twitter.com/3XsOWs03BR
— i24NEWS English (@i24NEWS_EN) November 29, 2017
प्राल्जक हा पुर्वी सैन्याधिकारी होता. शिक्षा सुनावताच तो "प्राजल्क हा गुन्हेगार नाही, मी तुमचा निर्णय नाकारतो " असे ओरडला आणि त्याने कुपीतले द्रावण प्राशन केले. माझ्या अशिलाने आताच विष घेतल्याचे मला सांगितले आहे असे त्याच्या वकिलाने सांगताच सुनावणी थांबवण्यात आली. 1992-95 या कालावधीत युगोस्लावियामध्ये झालेल्या युद्धांसाठी आयसीटीवाय हा न्यायालयीन लवाद स्थापन करण्यात आला होता. दोन दशके कामकाज झाल्यानंतर पुढच्या महिन्यात त्याचे सर्व कामकाज थांबवले जाणार होते. ही बातमी पसरल्यावर क्रोएशियन नागरिकांनी त्याच्या स्मरणार्थ मेणबत्त्याही लावल्या.
आयसीटीवायच्या समोर आलेल्या गुन्हेगारांनी आत्महत्या करण्याची ही पहिलीट वेळ नाही. मिलान बॅबिक या क्रोएशियन सर्ब नेत्याने संयुक्त राष्ट्राच्या कारागृहात 2006 साली आत्महत्या केली होती. तर 1998 साली स्लावको डोकमॅनोविक यानेही स्वतःचे आयुष्य संपविले होते. सर्बियाचे माजी अध्यक्ष स्लोबोदान मिलोसेविक यांचा 2006 साली कारागृहातच नैसर्गिक कारणांनी मृत्यू झाला होता.