कर्मचाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी बॉसने टॉयलेटमध्ये बसवले कॅमेरे, फोटो लीक!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 12:46 PM2022-09-23T12:46:54+5:302022-09-23T12:56:07+5:30
Boss installs cameras in toilets : फोटो समोर आल्यानंतर कंपनीने सर्व आरोप फेटाळून लावले असून, कंपनीने टॉयलेटमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले नसल्याचे म्हटले आहे.
नवी दिल्ली : कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी एका कंपनीच्या बॉसने टॉयलेटमध्ये सुद्धा कॅमेरे बसवल्याचे म्हटले जात आहे. या बॉसला संशय होता की टॉयलेटमध्ये कर्मचारी धूम्रपान करतात आणि फोनवर बराच वेळ घालवतात. दरम्यान, टॉयलेटचे काही फोटो ऑनलाईन लीक झाल्यानंतर सोशल मीडियावर कंपनीच्या बॉसवर टीका होत आहे. मात्र, फोटो समोर आल्यानंतर कंपनीने सर्व आरोप फेटाळून लावले असून, कंपनीने टॉयलेटमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले नसल्याचे म्हटले आहे.
हे प्रकरण दक्षिण चीनमधील एका शहरातील आहे. येथील एका टेक कंपनीवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. रेड स्टार न्यूजच्या रिपोर्टनुसार, टॉयलेटमध्ये ब्रेक टाइम घालवणाऱ्या कर्मचाऱ्यांचे तीन फोटो लीक झाले आणि नंतर ते सोशल मीडियावर व्हायरल झाले. तिन्ही फोटोंमध्ये तीन वेगवेगळे पुरुष टॉयलेटमध्ये धूम्रपान करताना आणि फोन वापरताना दिसत आहेत.
कंपनीने इतर कर्मचाऱ्यांना सावध करण्यासाठी या तीन फोटोंचा वापर केल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. जेणेकरून इतरांनी कंपनीच्या पॉलीसीची उल्लंघन करू नये. पण या फोटोंमुळे सोशल मीडियावर कंपनीवर टीका केली जात आहे. कर्मचाऱ्यांच्या गोपनीयतेवर प्रश्न उपस्थित करून सोशल मीडियावर लोक कंपनीला टार्गेट करताना दिसून येत आहे.
एका युजरने लिहिले - या कृत्यासाठी कंपनीवर कारवाई झाली पाहिजे. तर दुसर्याने युजरने लिहिले - ते लोक माणसांनाही प्राण्यांप्रमाणे वागवतात. तर तिसऱ्या युजरने - कंपनीच्या या कृतीचे वर्णन एक भयानक स्वप्न असल्याचे सांगितले. रिपोर्टनुसार, कॅमेऱ्यात कैद झालेल्या दोघांना कंपनीने नोकरीवरून काढले आहे. तर बाकीच्या कर्मचाऱ्यांचा बोनस कापून त्यांना कंपनीने शेवटचा इशारा दिला आहे.
दरम्यान, कर्मचाऱ्यांनी लक्ष्मणरेषा ओलांडली होती. त्यामुळे त्याच्यावर कठोर कारवाई झाली, असे या निर्णयावर कंपनीने म्हटले आहे. तर कंपनीच्या एका कर्मचाऱ्याने रेड स्टार न्यूजशी संवाद साधला. यावेळी कर्मचाऱ्यांने सांगितले की, नक्कीच काही खाजगी क्षण कॅमेऱ्यात कैद केले जातील, परंतु खरे सांगायचे तर, या पॉलिसीचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत.