मुद्द्याची गोष्ट - "जागतिक विकासाचे करू शकतो भारत नेतृत्व"

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2024 11:16 AM2024-04-07T11:16:37+5:302024-04-07T11:17:33+5:30

‘लोकमत जागतिक आर्थिक परिषदे’मध्ये भारताची वर्तमान आर्थिक स्थिती आणि पुढच्या काही वर्षांत अर्थव्यवस्था कसा आकार घेईल, याविषयीचा आपला सखोल दृष्टिकोन मांडला.

Bottom line - India can lead global development, Says vijay darda | मुद्द्याची गोष्ट - "जागतिक विकासाचे करू शकतो भारत नेतृत्व"

मुद्द्याची गोष्ट - "जागतिक विकासाचे करू शकतो भारत नेतृत्व"

मुद्द्याची गोष्ट : ‘लोकमत एडिटोरिअल बोर्ड’चे चेअरमन आणि माजी खासदार डॉ. विजय दर्डा यांनी सिंगापूर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या ‘लोकमत जागतिक आर्थिक परिषदे’मध्ये भारताची वर्तमान आर्थिक स्थिती आणि पुढच्या काही वर्षांत अर्थव्यवस्था कसा आकार घेईल, याविषयीचा आपला सखोल दृष्टिकोन मांडला. त्या मांडणीचा हा संपादित सारांश...

भारताच्या अर्थव्यवस्थेतील बदल
भारताच्या अनोख्या प्रवासाबद्दल बोलताना डॉ. दर्डा यांनी देश कृषिप्रधानतेकडून सेवाप्रधान अर्थव्यवस्थेकडे कसा गेला, याकडे प्रामुख्याने लक्ष वेधले. महाशक्ती होण्याचा पारंपरिक मार्ग बाजूला ठेवून हा प्रवास झाल्याचे ते म्हणाले. बेरोजगारीचे आव्हान पेलण्याचे महत्त्व अधोरेखित करताना युवकांची वाढती संख्या लक्षात घेऊन डॉ. दर्डा यांनी भक्कम पायाभूत रचना, चांगले शिक्षण आणि सुलभ आरोग्यसेवेच्या आवश्यकतेवर भर दिला. ते म्हणाले, ‘भारताकडे युवकांची संख्या जास्त असणे लोकसंख्यास्त्रीय लाभांश मिळण्याच्या दृष्टीने फायद्याचे आहे. पुढची २५ वर्षे त्याचा लाभ मिळत राहील. मात्र पायाभूत रचना, चांगले शिक्षण आणि आरोग्य सुविधा अधिक मजबूत केल्यास स्थानिक रोजगार वाढण्यास मदत होईल.’

अपेक्षा उंचावणारी क्षेत्रे आणि गेम चेंजर्स
इलेक्ट्रॉनिक उपकरणे, संरक्षण साहित्य, ऊर्जा पुनर्निर्माण, औषधनिर्माण, माहिती तंत्रज्ञान सेवा, तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि यंत्राद्वारे अध्ययनाच्या निर्मितीत भारताची क्षमता मोठी असल्याचे डॉ. दर्डा यांनी सांगितले. वेगाने विकसित होत असलेल्या क्षेत्रांचा परिचय करून देताना शेतीचे आधुनिकीकरण आणि संबंधित पायाभूत सुविधा वाढविण्याचा विषय उचलून धरत त्यांनी सेवा क्षेत्रात भारताने केलेल्या प्रगतीची प्रशंसा केली. प्रचंड मोठा आकार असलेली देशांतर्गत बाजारपेठ, कुशल श्रमशक्ती आणि अनुकूल नियामक व्यवस्थेमुळे निर्माणाचे केंद्र म्हणून भारत सर्वांना निर्विवादपणे आकर्षित करतो आहे, असे सांगून ते म्हणाले, ‘सध्या विशेष ज्ञानाचा फायदा घेत नव्या गोष्टींना प्रोत्साहन देऊन भारत विविध क्षेत्रांत बद्दल घडविणाऱ्या विकासाचे नेतृत्व
करू शकतो.’

नागपूरचा व्यापक क्षेत्रीय विकास
nनागपूरमध्ये झालेल्या उल्लेखनीय बदलावर चर्चा करताना डॉ. दर्डा यांनी एक गतिशील आर्थिक केंद्र म्हणून हे शहर कसे आकाराला आले, यावर प्रकाश टाकला. पायाभूत सुविधांची प्रगती आणि धोरणात्मक पावले टाकल्याने हे शक्य झाले, असे ते म्हणाले.
nसंरक्षण संस्था, शैक्षणिक संस्था व माहिती उद्योगांसारख्या उगवत्या क्षेत्रांमध्ये नागपूरने दिलेल्या योगदानाची त्यांनी विस्ताराने माहिती दिली. नागपूरचे वाढते महत्त्व हे क्षेत्रीय दृष्टिकोनातून या शहराचे महत्त्व अधोरेखित करते, त्यातून आर्थिक विकासाला गती मिळते आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतात, असे सांगून ते म्हणाले, कृषी निर्यात आणखी भक्कम करण्यापर्यंत विकासागती नेली पाहिजे; त्यामुळे विदर्भाच्या आर्थिक स्थितीला बळकटी येईल!

भविष्यकालीन योजना आणि डिजिटायझेशन
लोकमत माध्यम समूहाच्या आगामी योजना डॉ. दर्डा यांनी या परिषदेत विशद केल्या. महाराष्ट्र, गोवा आणि दिल्लीत समूहाची उत्तरोत्तर वाढ होत गेली, यावर त्यांनी प्रकाश टाकला. ‘लोकमत’च्या वाढत्या डिजिटल क्षमतांची माहिती देऊन भविष्यात हाती घेण्यात येणाऱ्या वैश्विक उपक्रमांचे सूतोवाचही त्यांनी केले.
नवे तंत्रज्ञान आणि वाचकांच्या सहभागाबद्दल समूहाची बांधिलकी त्यांनी अधोरेखित करताना डॉ. दर्डा म्हणाले, ‘जगात काय चालले आहे, आणि वाचकांना काय हवे आहे, याचा विचार सातत्याने करून त्यानुसार आपली ध्येयधोरणे आखणारा लोकमत समूह नजीकच्या भविष्यात काही परिवर्तनकारी योजना समोर आणून वैश्विक पातळीवर उत्कृष्ट पत्रकारितेचा एक प्रकाशस्तंभ म्हणून आपली स्थिती अधिक मजबूत करील.’
भारताच्या आर्थिक सामाजिक विकासासाठी एक समग्र दृष्टिकोन कसा असावा, हे डॉ. दर्डा यांनी आपल्या मांडणीत दाखवून दिले. निरंतर विकासासाठी धोरणांची गरज आणि कृतीप्रवण उचित असा मार्ग यातूनच वैश्विक आर्थिक परिघावर भारताची स्थिती अधिकाधिक मजबूत होत जाईल, असे ते म्हणाले.

भारताच्या विकासात एनआरआयचे योगदान
देशाच्या विकासात अनिवासी भारतीयांनी दिलेल्या योगदानाची डॉ. दर्डा यांनी प्रशंसा केली. आर्थिक विकास आणि आधुनिक तंत्रज्ञान या गोष्टींना प्रोत्साहन देण्यात अनिवासी भारतीयांनी महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे त्यांनी सांगितले.
या मंडळींची जाणकारी आणि साधनसुविधा यांचा वापर करून कारभार वाढवला पाहिजे, ज्यातून देशाच्या विकासाला गती मिळेल.
अनिवासी भारतीय हे बदलत्या वर्तमानाला सामोरे जात राहण्याची लवचिकता आणि सरलतेचे प्रतीक असल्याने आधुनिक गोष्टी आणि प्रगतीला प्रेरणा मिळते, असे सांगून डॉ. दर्डा म्हणाले, व्यापारास अनुकूल परिस्थितीजन्य तंत्राला प्रोत्साहन देऊन भारत अनिवासी भारतीयांची अफाट क्षमता वापरू शकतो आणि वैश्विक आर्थिक महाशक्तीच्या स्वरूपात आपली स्थिती मजबूत करू शकतो.

‘लोकमत समूहा’ची निरंतर बांधिलकी
‘लोकमत माध्यम समूहा’ने आजवर केलेली कामे आणि भविष्यातील योजनांबद्दल बोलताना डॉ. दर्डा म्हणाले, लोकाभिमुखता ठेवून पत्रकारिता आणि समाज उद्धाराशी बांधिलकी, हे आमचे ब्रीद आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपण्यास आम्ही समर्पित आहोत. केवळ बातम्या देण्यापुरता आमचा प्रवास मर्यादित नसून त्याच्या पुढले क्षितिज आम्हाला खुणावत असते. माध्यमाच्या क्षेत्रात होणारे आमूलाग्र बदल वेगाने आत्मसात करत पुढे निघालेला हा समूह आपल्या व्रताशी बांधील आहे.

 

 

Web Title: Bottom line - India can lead global development, Says vijay darda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.