ब्रेन ड्रेन नव्हे ब्रेन गेन

By admin | Published: September 28, 2015 11:44 PM2015-09-28T23:44:47+5:302015-09-28T23:44:47+5:30

भारतातील प्रतिभावंतांनी विदेशाची वाट धरणे म्हणजे ब्रेन ड्रेन नव्हे, तर खऱ्या अर्थाने ब्रेन गेन (प्रतिभेचा लाभ) म्हणता येईल

Brain drain no brain gain | ब्रेन ड्रेन नव्हे ब्रेन गेन

ब्रेन ड्रेन नव्हे ब्रेन गेन

Next

सॅन जोस : भारतातील प्रतिभावंतांनी विदेशाची वाट धरणे म्हणजे ब्रेन ड्रेन नव्हे, तर खऱ्या अर्थाने ब्रेन गेन (प्रतिभेचा लाभ) म्हणता येईल. हे भारतीय प्रतिभावंत योग्य वेळी भारताची सेवा करून भारताच्या जडणघडणीत योगदान जरूर देतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सॅप’ सेंटर येथे आयोजित भारतीय समुदायापुढे बोलताना व्यक्त केला.
पंतप्रधान मोदी यांनी तासभराच्या भाषणात ‘ब्रेन ड्रेन’ला एक नवीन व्याख्या देत विदेशातील भारतातील प्रतिभावंतांना भारताची सेवा करण्यास पुढे येण्याचे आवाहन केले. प्रत्येक भारतीयानेअन्य लोकांना आपले प्रतिभाशाली सामर्थ्य दाखवून देण्याची वेळ आली आहे. तुमच्या बोटांची जादू की-बोर्ड आणि कॉम्प्युटरवर पसरली असून तुमची बांधिलकीही वाखणण्याजोगी आहे. २५ वर्षांनंतर मी कॅलिफोर्नियात आलो आहे. खूप काही बदलले आहे. मला नवीन चेहरे दिसत असून या ठिकाणी भारताचा आवाज ऐकू शकतो, अशी साद घालताच उपस्थितांनी एकच जयघोष केला.
भ्रष्टाचाराशी मूक लढा
भ्रष्टाचाराविरुद्ध आपण मूक आघाडी कशी उघडली हे सांगताना ते म्हणाले की, बनावट गॅस जोडण्या खंडित करण्यासाठी आधारकार्डची मदत घेतली. यामुळे पाच कोटी बनावट जोडण्या खंडित झाल्या. आता केवळ १३ कोटी जोडण्यांसाठी अनुदान द्यावे लागते.
या पावलामुळे १९ हजार कोटी रुपयांची बचत होऊ शकली. गॅस सबसिडी सोडून देण्याच्या माझ्या आवाहनानंतर ३० लाख लोकांनी सबसिडी सोडून दिली, असेही ते म्हणाले.
स्वातंत्र्य आणि दारिद्य्र
अमेरिकेतील शीख विस्थापितांनी २० व्या शतकाच्या प्रारंभी सुरू केलेल्या गदर चळवळीच्या स्मृती जागवताना मोदी म्हणाले की, तेव्हा अमेरिकेत शेतीत काम करण्यासाठी आलेल्या भारतीय शिखांना भारताच्या स्वातंत्र्यासाठी काहीतरी करावे असे वाटत होते. त्यामुळे तेव्हा त्यांनी गदर चळवळ सुरू केली. आता अमेरिकेत काम करणाऱ्या तरुणाईला मायदेशातील दारिद्य्र दूर व्हावे, असे वाटते. (वृत्तसंस्था)


परिवर्तनाचे श्रेय संकल्पशक्तीला
आपल्या जीवनाचा प्रत्येक मिनिट आपण देशसेवेसाठी देत आहोत. आपण देशासाठी जगू आणि मरू, असेही ते म्हणाले. गेल्या १६ महिन्यांत जगाच्या भारताविषयीच्या दृष्टिकोनात नाट्यमय बदल झाला आहे. जग आता भारताकडे नव्या दृष्टीने आणि मोठ्या अपेक्षेने पाहत आहे, असे सांगून या परिवर्तनाचे श्रेय भारतीयांच्या संकल्पशक्तीला जाते, असे ते म्हणाले. देशाची ६५ टक्के लोकसंख्या (८०० दशलक्ष) ३५ वर्षांखालील आहे. त्यामुळे भारताच्या यशाची मला खात्री आहे. हा देश मागे राहणार नाही, हे मी तुम्हाला खात्रीशीरपणे सांगू शकतो. ८०० दशलक्ष तरुण आणि त्यांच्या १ अब्ज ६० लाख बाहूंना कोणीही रोखू शकणार नाही, असे ते म्हणाले.
टाळ्याच टाळ्या
मोदींच्या भाषणादरम्यान उपस्थित अनिवासी भारतीय उभे राहून टाळ्यांचा कडकडाट करत होते. त्यामुळे मोदींना अनेकदा भाषण थांबवावे लागले. काही वेळा तर टाळ्या थांबवा, असे आवाहन मोदींना करावे लागले. टाळ्यांनी सभागृह दणाणून गेले होते. सभागृहातील हा प्रतिसाद मोदींच्या चेहऱ्यावरही झळकत होता.
————————————-
भारतीयांच्या बोटातील जादूने
बदलवला जगाचा दृष्टिकोन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सिलिकॉन व्हॅलीत भारतीय अमेरिकींच्या जनसागराला संबोधित केले. यावेळी काँग्रेसचे अनेक सदस्य उपस्थित होते. येथील भारतीयांच्या बोटातील जादूने जगाचा भारताविषयीचा दृष्टिकोन बदलविण्याची किमया केली. भारतात काय घडते आहे याची भारतात राहणाऱ्यांपेक्षा येथे राहणाऱ्यांना अधिक चांगली जाण आहे. तुम्ही येथून जगात बदल घडवून आणत आहात. जे बदलाचा प्रतिकार करतात ते २१ व्या शकतात काहबाह्य ठरतात, असे मोदी सॅन जोसमध्ये खचाखच भरलेल्या सभागृहाला संबोधित करताना म्हणाले.

Web Title: Brain drain no brain gain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.