आॅलिव्ह आॅइलमध्ये मेंदूच्या कॅन्सरला आळा घालण्याची शक्ती!
By Admin | Published: June 6, 2017 05:14 PM2017-06-06T17:14:29+5:302017-06-06T17:14:29+5:30
शास्त्रज्ञ करताहेत अधिक संशोधन..
- मयूर पठाडे
कॅन्सरनं सध्या सगळ्या जगातच धुमाकूळ घातला आहे. वेगवेगळ्या कॅन्सरनं मृत्यूमुखी पडणाऱ्या लोकांची संख्याही जगभरात खूपच मोठी आहे. भारतातही या विकाराचं प्रमाण खूपच मोठं आहे आणि जागतिक आरोग्य संघटनेनं यावर वेळोवेळी चिंताही व्यक्त केली आहे.
नुकत्याच झालेल्या जागतिक तंबाकूविरोधी दिनीही तज्ञांनी याबद्दल चिंता व्यक्त केली होती आणि त्यासाठी आपल्या लाइफस्टाइलमध्ये सुधारणा करण्याचा सल्ला दिला होता.
जगभरात त्याविषयी जनजागृती सुरू आहे आणि त्याबाबतच्या उपाययोजनांसाठीही प्रयत्न सुरू आहेत.
याबद्दलचा एक प्रयत्न नुकताच ब्रिटनच्या एडिनबर्ग युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी केला.
आॅलिव्ह आॅईलमुळे मेंदूच्या कॅन्सरला आळा बसू शकतो असा त्यांच्या संशोधनाचा निष्कर्ष आहे.
प्रत्यक्ष मानवावर, मानवाच्या मेंदूवर आॅलिव्ह आॅइलचा काय परिणाम होतो, प्रत्यक्ष खाण्यात जर आॅलिव्ह आॅइलचा समावेश केला तर मेंदूचा कॅन्सर त्यामुळे आटोक्यात येईल का याबाबतचा प्रयोग मात्र प्रत्यक्ष मानवावर शास्त्रज्ञांनी करून पाहिलेला नाही. त्यांनी फक्त प्रयोगशाळेतच याच्या चाचण्या घेतल्या आहेत आणि त्या सकारात्मक आल्या आहेत.
अधिक संशोधनानंतर या बाबी पुरेशा स्पष्ट होतील असं संशोधकांचं म्हणणं आहे.