'या' देशाच्या राष्ट्रपतींनीच सोशल डिस्टंसिंगला बसवले धाब्यावर, रस्त्यावर दिसताच नागरिकांनी 'असा' व्यक्त केला रोष
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 11:56 AM2020-04-11T11:56:59+5:302020-04-11T12:30:06+5:30
ब्राझीलचे राष्ट्रपती बोल्सोनारो हे शुक्रवारी केवळ रस्त्यांवर दिसले नाही, तर ते मिलट्री हॉस्पिटल, मेडिकल आणि नंतर आपल्या एका मुलालाही भेटायला गेले.
रियो दी जेनेरियो : कोरोना विरोधात सध्या संपूर्ण जगाचे युद्ध सुरू आहे. या युद्धात सामाजिक अंतर अथवा सोशल डिस्टंसिंग हे शस्त्र अत्यंत प्रभावी ठरत आहे. मात्र, जगात एक देश असाही आहे, जेथे खुद्द राष्ट्रपतीच सोशल डिस्टंसिंगला हरताळ फासत आहेत. हो, या देशाचे नाव आहे ब्राझील. येथील राष्ट्रपती जेयर बोल्सोनारो शुक्रवारी थेट ब्राझीलच्या रस्त्यांवरच दिसून आले.
वृत्तपत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, ब्राझीलचे राष्ट्रपती बोल्सोनारो हे शुक्रवारी केवळ रस्त्यांवर दिसले नाही, तर ते मिलट्री हॉस्पिटल, मेडिकल आणि नंतर आपल्या एका मुलालाही भेटायला गेले. एवढेच नाही, तर एका ठिकाणी समर्थकांनी त्यांचे स्वागतही केले. असे असले, तरी त्यांना काही नागरिकांच्या रोषालाही सामोरे जावे लागले. काही लोकांनी तर रागाच्या भरात भांडेही फेकले. ब्राझीलच्या राष्ट्रपतींना सोशल डिस्टंसिंगशी काही एक देणे घेणे नाही, अशी टिकाही येथील काही लोकांनी केली आहे.
खरेतर, ब्राझीलचे राष्ट्रपती कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी केल्या जात असलेल्या सोशल डिस्टंसिंग उपायाच्या विरोधात आहेत. सोशल डिस्टंसिंगमुळे अर्थव्यवस्थेवर मोठा प्रभाव पडेल. कोरोना म्हणजे एक साधारण आजार आहे, असे त्यांना वाटते. कोरोना संकटात बोल्सोनारो यांची लोकप्रियता कमी झाली आहे. ब्राझीलमध्ये जसजशी कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे, तसतसा लोकांचा रागही वाढत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनोपासून बचाव करण्यासाठी ब्राझीलमधील मोठ-मोठ्या शहरांमध्ये लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे. येथे शुक्रवारपर्यंत 1,057 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. तर आतापर्यंत येथे एकूण 19,638 कोरोना बाधित सापडले आहेत.