"कोरोना लस लवकरात लवकर पाठवा"; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची पंतप्रधान मोदींना कळकळीची विनंती
By देवेश फडके | Published: January 9, 2021 01:55 PM2021-01-09T13:55:03+5:302021-01-09T13:57:27+5:30
ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जायर बोलसोनारो यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहून कोरोनाची लस पाठवण्याची विनंती केली आहे. ब्राझीलमध्ये अद्याप लसीकरण मोहिमेला प्रारंभ झालेला नाही.
ब्रासिलिया : नववर्षाच्या सुरुवातीलाच सीरम इन्स्टिट्यूच्या कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन कोरोना लसींना भारतात आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली. यानंतर लवकरच भारतात लसीकरणाची मोठी मोहीम हाती घेतली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जायर बोलसोनारो यांनी भारताचे पंतप्रधाननरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहून कोरोनाची लस पाठवण्याची विनंती केली आहे.
कोरोना संसर्गाने जागतिक पातळीवर थैमान घातले आहे. कोरोना नियंत्रण अद्याप कोणत्याही देशात झालेले नाही. कोरोनामुळे सर्वाधिक प्रभाव पडलेल्या देशांच्या यादीत ब्राझील दुसऱ्या स्थानावर आहे. ब्राझीलमध्ये अद्याप लसीकरण मोहिमेला प्रारंभ झालेला नाही. लसीकरणाला सुरुवात न झाल्यामुळे देशवासीयांना सरकारवर दबाव वाढत चालला आहे. यामुळे ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जायर बोलसोनारो यांनी भारताकडे मदत मागितली असून, कोरोना लस शक्य तितक्या लवकर पाठवण्याची विनंती पंतप्रधाननरेंद्र मोदी यांना केल्याची माहिती मिळाली आहे.
ब्राझीलच्या राष्ट्रपती कार्यालयाकडून एक पत्र पाठवण्यात आले आहे. भारतातील लसीकरण मोहिमेत कोणताही खंड पडू न देता ब्राझीलमधील राष्ट्रीस लसीकरणाचा प्रारंभ करण्यासाठी कोरोना लसीचे २० लाख डोस पाठवण्यात यावेत, अशी मी विनंती करतो, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
ब्राझील सरकार द्वारा संचालित फियोक्रूझ बायोमेडिकल सेंटरने एस्ट्राजेनेका नामक लसीचे लाखो डोस या महिन्याच्या अखेरपर्यंत उपलब्ध होऊ शकणार नाही, असे सांगितले. ब्राझीलमध्ये तातडीने कोणतीही लस उपलब्ध होण्याची शक्यता धुसर असल्यामुळे राष्ट्राध्यक्ष जायर बोलसोनारो यांनी भारताकडून लस मिळण्याबाबत पत्र पाठवल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, भारतातून येणाऱ्या लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी द्यावी, अशी विनंती फ्रियोक्रूझकडून ब्राझील सरकारला करण्यात आली आहे.