डॅनिएल आणि फुटबॉल वर्ल्डकपचं ‘सीक्रेट’!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 11:02 AM2022-12-23T11:02:03+5:302022-12-23T11:02:29+5:30

फुटबॉल हा जगातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ. जगभरातील बहुतांश देश हा खेळ खेळतात. त्यातही फुटबॉल वर्ल्डकप म्हणजे जगभरातील देशांसाठी अनोखी पर्वणी.

Brazilian sets record for most World Cups attended I want samba until dawn fifa world cup 2022 | डॅनिएल आणि फुटबॉल वर्ल्डकपचं ‘सीक्रेट’!

डॅनिएल आणि फुटबॉल वर्ल्डकपचं ‘सीक्रेट’!

googlenewsNext

फुटबॉल हा जगातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ. जगभरातील बहुतांश देश हा खेळ खेळतात. त्यातही फुटबॉल वर्ल्डकप म्हणजे जगभरातील देशांसाठी अनोखी पर्वणी. एखाद्या युद्धाच्या आवेषात, जगण्या-मरण्याच्या त्वेषात, तरीही ‘स्पोर्ट्स स्पिरीट’ कायम राखून हा विश्वचषक अख्ख्या जगाला एकत्र आणतो. संपूर्ण जगभरातले लोकही मैदानावरचं हे युद्ध, प्रत्येक देशाच्या लढवय्या सैनिकांचं त्यातलं कौशल्य, पदलालित्य पाहत आपलं देहभान विसरतो. या काळात संपूर्ण जगच जणू टीव्हीच्या पडद्यासमोर एकवटलेलं असतं. प्रत्येकालाच समरांगणावरचं हे युद्ध प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहायची इच्छा असते. ज्यांना हे शक्य होतं, ते त्या त्या देशांत जाऊन फुटबॉलचं हे युद्ध याचि देही, याचि डोळा पाहतात आणि धन्य होतात. बाकीचे रसिक आपली ही इच्छा टीव्हीच्या पडद्यासमोर बसून पूर्ण करतात. 

जगातला एक फुटबॉल शौकीन मात्र असा आहे, ज्याला लहानपणापासूनच फुटबॉलनं वेड लावलं आहे. त्यामुळे जगात ज्या ज्या वेळी, जिथे जिथे फुटबॉलचा विश्वचषक असेल, तिथे तो जातो आणि हे सामने पाहतो. हा फुटबॉल विश्वचषकाचा शौकीन आहे ब्राझीलचा. त्याचं नाव डॅनिएल स्ब्रूझी. सध्या ७५ वर्षांचे असलेले डॅनिएल यांनी गेल्या ४४ वर्षांपासून जवळपास प्रत्येक विश्वचषकाला हजेरी लावली आहे आणि आपल्या ब्राझील देशाच्या खेळाडूंना प्रोत्साहन दिलं आहे.

अपवाद फक्त १९८२ मध्ये स्पेन येथे झालेल्या फुटबॉल विश्वचषकाचा. केवळ त्याच वेळी ते तेथील विश्वचषकाला हजेरी लावू शकलेले नाहीत. वेगवेगळ्या देशांत झालेल्या तब्बल ११ विश्वचषकांना त्यांनी आतापर्यंत हजेरी लावली आहे. एखाद्या चाहत्यानं इतक्या विश्वचषकांना हजेरी लावण्याचा हा जागतिक विक्रम आहे. यंदा कतार येथे झालेल्या विश्वचषकातही त्यांनी हजेरी लावली होती. अर्थातच यापुढच्या विश्वचषकालाही त्यांना उपस्थित राहायचं आहे आणि यंदाचा विश्वचषक संपल्या दिवसापासूनच पुढच्या विश्वचषकाची त्यांची तयारी सुरू झाली आहे. 

ब्राझील हा देश मुळातच फुटबॉलवेडा. त्यावरची त्यांची मातब्बरीही मोठी. त्यामुळेच आतापर्यंत सर्वाधिक पाच वेळा म्हणजे १९५८, १९६२, १९७०, १९९४ आणि २००२ मध्ये ब्राझीलनं विश्वचषक पटकावला आहे. त्याखालोखाल नंबर लागतो तो इटली आणि जर्मनीचा. दोघांनीही चार, तर अर्जेंटिनानं तीन विश्वचषक जिंकले आहेत.

फुटबॉलच्या विश्वचषकाचा इतिहासच मुळात २२ विश्वचषकांचा. त्यातील तब्बल ११ विश्वचषक डॅनिएल यांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले आहेत. तो प्रत्येक अनुभव आजही त्यांच्या डोळ्यांसमोर ताजा आहे. ब्राझीलनं जसा फुटबॉल विश्वचषक विजयाचा इतिहास घडवला आहे, तसाच इतिहास ब्राझीलच्या या फुटबॉल शौकिनानंही घडवला आहे. त्यामुळेच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्येही त्यांचं नाव नोंदलं गेलं आहे. फुटबॉलचे ११ विश्वचषक त्या त्या देशात जाऊन पाहणारे ते जगातील एकमेव फुटबॉल शौकीन आहेत. अर्थातच केवळ विश्वविक्रम करण्यासाठी त्यांनी या सामन्यांना हजेरी लावलेली नाही, तर फुटबॉलप्रेम त्यांच्या रक्तातच आहे. डॅनिएल यांचं म्हणणं आहे, जोवर माझ्यात चालण्या-फिरण्याची शक्ती आहे, जोपर्यंत माझ्या शरीरात त्राण आहे, खरं तर जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत फुटबॉलच्या प्रत्येक विश्वचषकाला हजेरी लावण्याचा माझा प्रयत्न असेल.

या विश्वचषकांनी मला केवळ आनंद दिला नाही, तर वेगवेगळ्या देशांच्या संस्कृतीही मी खूप जवळून पाहू शकलो. फुटबॉलचं हे ऋण मी कधीही फेडू शकणार नाही. १९७८ मध्ये अर्जेंटिना येथे झालेला फुटबॉल विश्वचषक हा डॅनिएल यांचा पहिला विश्वचषक. या सामन्यांसाठी ते तिथे जातीनं हजर होते. या प्रत्येक विश्वचषकाचंही त्यांचं एक आगळंवेगळं वैशिष्ट्य आहे. या विश्वचषकात नववधूचा वेश परिधान करून त्यांनी सर्व सामने पाहिले होते. नंतर झालेल्या बहुतांश विश्वचषकांचे सामनेही त्यांनी महिलांचा वेश परिधान करून पाहिले. फुटबॉल विश्वचषक आयोजित करणारा देश आणि ब्राझील यांचं अतिशय सुयोग्य असं प्रतिनिधित्व त्यांच्या पोशाखात असतं.

चार दशकांची परंपरा यंदा मोडली! 
यंदा कतारमध्ये झालेल्या विश्वचषकाच्या दरम्यान डॅनिएल यांना आपली चार दशकांची परंपरा मोडावी लागली. महिलांचा वेश त्यांना यावेळी परिधान करता आला नाही. तसं करणं त्यांना त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं महाग पडलं असतं. महिलांचा पोशाख घातल्यामुळे २०१८ मध्ये रशियात सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवलं होतं. यावेळी त्यांनी अरब देशांमध्ये प्रचलित असलेला ‘लबादा’ परिधान केला होता. आतापर्यंत ज्या ज्या देशांत जाऊन त्यांनी विश्वचषकाचे सामने पाहिलेत, त्या त्या देशांचे झेंडे त्यांनी आपल्या या पोशाखावर एम्ब्रॉयडरी करून घेतले होते! 

Web Title: Brazilian sets record for most World Cups attended I want samba until dawn fifa world cup 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.