Covid 19 : कोरोनाच्या नियमांचं केलं उल्लंघन; 'या' देशाच्या राष्ट्राध्यक्षांनाच ठोठावला दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 01:48 PM2021-05-23T13:48:02+5:302021-05-23T13:51:23+5:30
Coronavirus : अद्यापही जगभरात मोठ्या प्रमाणात सापडत आहेत कोरोनाबाधित. सर्वाना कोरोनाविषयक नियमांचे पालन करण्याचे देण्यात येत आहेत निर्देश.
सध्या जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम आहे. प्रत्येक देश आपापल्या परीनं कोरोनाचा सामना करत आहे. दरम्यान, कोरोनाचा सामना करण्यासाठी अनेक देशांमध्ये कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दरम्यान, अमेरिकेनंतर कोरोनाचा सर्वाधिक फटका हा ब्राझीलला बसला आहे. ब्राझीलमध्ये कोरोना विषयक नियमांचं कठोर पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना कठोर शिक्षाही केली जात आहे. परंतु अशा परिस्थितीत ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेयर बोलसोनारो यांनाच कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी दंड ठोठावण्यात आला आहे.
राज्याच्या आरोग्य सुरक्षा नियमांचे पालन न केल्यास बोलसोनारोला दंड भरावा लागेल, असं मारन्हो राज्यातील केगवॉर्नर फ्लेव्हिओ दिनो यांनी शुक्रवारी सांगितलं. सुरक्षा नियमांचं पालन न करता होणाऱ्या सभांना चालना देण्यासाठी बोलसोनारो यांच्याविरोधात गुन्हा दाखल दाखल केला आहे. तसंच कायदा हा प्रत्येकाला लागू होतो असंही त्यांच्याकडून सांगण्यात आलं.
१०० लोकांना एकत्र येण्यावर निर्बंध लावण्यात आले आहेत आणि फेस मास्कचा वापर करणं अनिवार्य आहे, याची डिनो यांनी जनतेला आठवण करून दिली. बोलसोनारो यांच्या कार्यालयाकडे अपील करण्यासाठी १५ दिवसांची वेळ देण्यात आली आहे. त्यानंतर त्यांना ठोठावण्यात आलेल्या दंडाची रक्कम ठरवण्यात येणार आहे. एएफपी या वृत्तसंस्थेनं बोलसोनारो यांच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही.