जगातील पहिला पुरुष : नवजात कन्येला पित्याने दिले स्तनपान!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2018 05:56 AM2018-07-06T05:56:59+5:302018-07-06T05:56:59+5:30

प्रसूतीच्या वेळी कराव्या लागलेल्या ‘सिझेरियन’ शस्त्रक्रियेत गुंतागुंत निर्माण झाल्याने नवजात कन्येला पत्नी अंगावर पाजू शकत नाही अशी स्थिती आल्याने त्या कन्येला स्वत: स्तनपान देणाऱ्या मॅक्समिलन न्यूबॉयर या पित्याचे समाजमाध्यमांत कौतुक होत आहे.

Breastfeeding by Father for Newborn! | जगातील पहिला पुरुष : नवजात कन्येला पित्याने दिले स्तनपान!

जगातील पहिला पुरुष : नवजात कन्येला पित्याने दिले स्तनपान!

googlenewsNext

वॉशिंग्टन : प्रसूतीच्या वेळी कराव्या लागलेल्या ‘सिझेरियन’ शस्त्रक्रियेत गुंतागुंत निर्माण झाल्याने नवजात कन्येला पत्नी अंगावर पाजू शकत नाही अशी स्थिती आल्याने त्या कन्येला स्वत: स्तनपान देणाऱ्या मॅक्समिलन न्यूबॉयर या पित्याचे समाजमाध्यमांत कौतुक होत आहे.
नवजात अर्भकाला आईने स्तनपान देण्याचे वैद्यकीय व भावनिक महत्त्व विस्कॉन्सिन राज्यातील
न्यूबॉयर दाम्पत्यास डॉक्टर व परिसेविकांनी पटवून दिले होते. मॅक्समिलनची पत्नी एप्रिल त्या अनुभवाची प्रतीक्षाही करीत होती. परंतु प्राप्त परिस्थितीत ते शक्य होणार नाही हे नक्की झाल्यावर न्यूबॉयर दाम्पत्य खट्टू झाले.
सिबिल मार्टिन डेन्हे या परिसेविकेने त्यांना धीर दिला. मातेच्या अडचणीमुळे नवजात बालिकेस पहिल्या स्तनपानापासून वंचित ठेवण्याची गरज नाही, असे सांगून सिबिलने पिताही स्तनपान देऊ शकेल, असा पर्याय सुचविला. परिचर्या अभ्यासक्रमात ‘सप्लिमेंटल नर्सिंग मेथड’ म्हटले जाते, अशा पद्धतीने स्तनपान देण्याची व्यवस्थाही तिने उपलब्ध केली.
आनंदित मॅक्समिलनने हा पर्याय मान्य करून कन्येला पहिले स्तनपान दिले. परिसेविका सिबिल हिने त्या क्षणांचे व्हिडीओ चित्रीकरण केले. नवजात अपत्यास स्तनपान देणारा जगातील पहिला पिता ठरल्याबद्दल आनंद व्यक्त करणाºया मॅक्समिलनच्या संदेशासह हा व्हिडीओ फेसबुकवर पोस्ट केला
गेला. अपत्यजन्माच्या वेळी पालकत्वाची अशीही जबाबदारी पार पाडणाºया मॅक्समिलनचे कौतुक केले गेले. (वृत्तसंस्था)

कसे केले स्तनपान?
अशा पद्धतीने स्तनपान करण्यासाठी ‘सक्शन पंप’चा वापर केला जातो. पंपाला नळी असते व बाळाला चोखून दूध पिता यावे यासाठी नळीच्या टोकाला ‘निपल’ बसविलेले असते.
मातेचे पहिले चिकासारखे घट्ट दूध या पंपाच्या नळीतून पुढे ढकलले जाते. या क्रियेत मुलाला दूध पाजण्याइतकेच पाजणाºया व्यक्तीच्या त्वचेचा स्पर्श होऊन उब मिळणेही महत्त्वाचे असते.
मॅक्समिलनने आपण बाळाला अंगावरच पाजतो आहोत, असे छातीशी धरून पर्यायी पद्धतीने स्तनपान दिले.

मातांसाठी
केलेली सोय
ज्या मातांना अंगावर कमी दूध येते त्यांच्यासाठी, दुग्धग्रंथींचे स्रवण वाढविण्यासाठी व ज्या मुलांना दूध ओढण्यात अडचण येते त्यांचे स्तनपान सुलभ करण्यासाठी या पर्यायी व पूरक स्तनपानाचे तंत्र विकसित करण्यात आले आहे. मात्र पुरुषाने स्तनपान देण्यासाठी त्याचा प्रथमच वापर झाला.

Web Title: Breastfeeding by Father for Newborn!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.