'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 09:40 PM2024-10-23T21:40:52+5:302024-10-23T21:41:31+5:30

PM Modi- Xi Jinping Bilateral Meeting: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात पाच वर्षांनंतर द्विपक्षीय बैठक झाली.

BRICS Summit 2024: 'Border peace a priority', 50-minute meeting between PM Modi and Xi Jinping | 'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक

'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक

PM Modi- Xi Jinping Bilateral Meeting : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग ब्रिक्स शिखर परिषदेसाठी रशियात आहेत. यादरम्यान, या दोन्ही नेत्यांची पाच वर्षांनंतर द्विपक्षीय बैठक झाली. ही बैठक सुमारे 50 मिनिटे चालली. भारत आणि चीनने सीमावाद मिटवण्यासाठी एक करार केला आहे. त्यानंतर आता ही महत्वपूर्ण बैठक झाली आहे. 

द्विपक्षीय बैठकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "जागतिक शांतता आणि स्थैर्यासाठी ही बैठक महत्त्वाची आहे. आम्ही सीमेवरील सहमतीचे स्वागत करतोत. मला विश्वास आहे की आम्ही खुल्या मनाने चर्चा करू आणि आमची चर्चा रचनात्मक होईल."

पीएम मोदींचे ट्विट
बैठक संपल्यानंतर पंतप्रधान मोदींनी X वर पोस्ट केली. त्यांनी लिहिले, "कझान ब्रिक्स परिषदेच्या वेळी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली. भारत-चीन संबंध आपल्या देशांच्या लोकांसाठी, तसेच प्रादेशिक आणि जागतिक शांतता आणि स्थिरतेसाठी महत्त्वाचे आहेत. परस्पर विश्वास, परस्पर आदर आणि परस्पर संवेदनशीलता द्विपक्षीय संबंधांना करेल."

शी जिनपिंग काय म्हणाले?
भारत आणि चीन यांच्यातील द्विपक्षीय बैठकीदरम्यान चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग म्हणाले, "कझानमध्ये पंतप्रधान मोदींना भेटून मला खूप आनंद झाला. पाच वर्षांत आम्ही पहिल्यांदाच औपचारिकपणे भेटलो आहोत. आमच्या दोन्ही देशांचे लोक आणि आंतरराष्ट्रीय समुदाय आमच्या बैठकीकडे लक्ष ठेवून होते. चीन आणि भारत या दोन्ही प्राचीन सभ्यता ग्लोबल साउथचे महत्त्वाचे सदस्य आहेत."

2019 मध्ये शेवटची बैठक
दोन विकसनशील देशांच्या प्रमुख नेत्यांची शेवटची भेट ऑक्टोबर 2019 मध्ये महाबलीपुरम येथे झाली होती. त्यानंतर त्यांनी बाली (2022) आणि जोहान्सबर्ग (2023) येथे काही संक्षिप्त बैठका घेतल्या, पण बुधवारची (23 ऑक्टोबर 2024) बैठक ही पहिली अधिकृत द्विपक्षीय बैठक आहे. चार वर्षांपासून सुरू असलेला गतिरोध संपवण्यात पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यातील बैठक हे मोठे यश असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

Web Title: BRICS Summit 2024: 'Border peace a priority', 50-minute meeting between PM Modi and Xi Jinping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.