पीएम मोदी, पुतिन आणि शी जिनपिंग यांचा हसतानाचा फटो होतोय व्हायरल, अमेरिकेचं टेन्शन वाढणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 12:59 PM2024-10-23T12:59:33+5:302024-10-23T13:02:18+5:30
या फोटोमध्ये पीएम मोदी, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन जवळ जवळ बसलेले असून हसताना दिसत आहेत.
रशियातील कझान येथे सुरू असलेल्या 16व्या ब्रिक्स परिषदेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. यातच एक फोटो सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. जो अमेरिकेचे टेन्शन वाढवणारा आहे. या फोटोमध्ये पीएम मोदी, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन जवळ जवळ बसलेले असून हसताना दिसत आहेत.
जगातील बलाढ्य देशांपैकी असलेले भारत, रशिया आणि चीनच्या सर्वोच्च नेत्यांचा हा हसतानाचा फटो अमेरिकेचे टेन्शन वाढवत असेल. खरे तर, BRICS हा पाच उदयोन्मुख अर्थव्यवस्थांचा एक आंतरराष्ट्रीय गट आहे. यात ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे. मात्र, यावेळी इराण, इजिप्त, इथिओपिया आणि संयुक्त अरब अमिराती हे चार नवे देशही यात सहभागी झाले आहेत. महत्वाचे म्हणजे, ब्रिक्स गटातील देश हा अमेरिकेसाठी नेहमीच चिंतेचा विषय राहिला आहे.
ब्रिक्समध्ये पंतप्रधान मोदी यांचे ग्रँड वेलकम -
ब्रिक्स परिषदेसाठी पोहोचलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ग्रँड वेलकम करण्यात आले. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी त्यांचे जबरदस्त स्वागत केले. त्यांनी पंतप्रधान मोदी यांची गळाभेट घेतली. यापूर्वी एअरपोर्टवर रशियातील राज्य तरारास्तानच्या प्रमुखांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. यानंतर, पुतिन आणि पंतप्रधान मोदी यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. यावेळी पंतप्रदान मोदींनी म्हणाले की, त्यांचे गेल्या 3 महिन्यांत दोन वेळा रशिया दौऱ्यावर येणे हे दोन्ही देशातील मित्रत्वाच्या संबंधांचे प्रमाण आहे.
आजच शी जिनपिंग यांना भेटणार मोदी -
आज पाच वर्षांनंतर पंतप्रधान मोदी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना भेटणार आहेत. दोन्ही देशांदरम्यानचा सीमा वाद सोडविण्यासंदर्भात करण्यात आलेल्या घोषणेनंतर, ही पहिलीच भेट आहे. या भेटीपूर्वीच व्हायरल झालेला फोटो बरंच काही सांगून जातो, या फोटोत पुतिन हे पीएम मोदी आणि जिनपिंग यांना जोडणाऱ्या पुलाप्रमाणे दिसत आहेत.