'नागा कवटीचा' लाखोंमध्ये होणारा लिलाव रद्द; भारताच्या विरोधानंतर ब्रिटनने उचलले पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2024 21:29 IST2024-10-10T21:27:38+5:302024-10-10T21:29:51+5:30
या कवटीच्या लिलावाविरोधात भारतातून तीव्र विरोध झाला.

'नागा कवटीचा' लाखोंमध्ये होणारा लिलाव रद्द; भारताच्या विरोधानंतर ब्रिटनने उचलले पाऊल
Auction News : ब्रिटेनमध्ये 19व्या शतकातील भारतील 'नागा कवटी'चा होणारा लिलाव थांबवण्यात आला आहे. एका ब्रिटिश ऑक्शन हाऊसने येत्या 9 ऑक्टोबर रोजी हा लिलाव आयोजित केला होता. पण, भारतातून त्याला प्रचंड विरोध झाल्यामुळे हा लिलाव रद्द करण्यात आला आहे. या लिलावाबाबत नागालँडचे मुख्यमंत्री नेफियु रिओ यांनी भारत सरकारला पत्र लिहून लिलाव थांबवण्याची मागणी केली होती. नागा समाजाच्या पूर्वजांच्या अवशेषांचा लिलाव करणे म्हणजे वसाहतवादी हिंसाचार असल्याचे त्यांचे म्हणने आहे.
नागालँडच्या मुख्यमंत्र्यांचे पत्र
ऑक्सफर्डशायर येथील स्वान ऑक्शन हाऊस नागा कवटीचा ऑनलाइन लिलाव करणार होते. या कवटीसोबतच जगभरातून गोळा केलेल्या अनेक कवट्या आणि इतर अवशेषांचा लिलावदेखील होणार होता. या लिलावात भारतील नागा जमातीची शिंगे असलेली मानवी कवटीदेखील ठेवण्यात आली होती. पण, नागालँडमध्ये या लिलावावरुन निदर्शने झाली. मुख्यमंत्री नेफियु रिओ यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना पत्र लिहून हा लिलाव थांबवण्याची मागणी केली.
नागालँडच्या मुख्यमंत्र्यांनी परराष्ट्र मंत्र्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात म्हटले की, 'ब्रिटनमधील नागा जमातीच्या अवशेषांच्या लिलावाचे वृत्त समजताच राज्यातील सर्व समुदायांनी आक्षेप घेतला आहे. हा आमच्या लोकांसाठी अतिशय भावनिक आणि पवित्र मुद्दा आहे. मृतांच्या अवशेषांना आदर आणि सन्मान देण्याची आपली परंपरा आहे. कवटीचा लिलाव थांबवण्यासाठी त्यांनी परराष्ट्रमंत्र्यांना हे प्रकरण लंडनमधील भारतीय उच्चायुक्तांकडे मांडण्याची विनंती केली.
दरम्यान, फोरम फॉर नागा रिकॉन्सिलिएशन (FNR) ने देखील या प्रकरणावर चिंता व्यक्त केली. FNR ने असा दावा केला की, मानवी अवशेषांचा लिलाव संयुक्त राष्ट्रांच्या कलम 15 चे उल्लंघन करते. FNR ने विक्रीचा निषेध करण्यासाठी थेट ऑक्शन हाउसशी संपर्क साधला आणि ती मानवी कवटी नागालँडला परत पाठवण्याचे आवाहन केले.
नागा कवटी किती मौल्यवान?
ऑक्शन हाउसने आपल्या लिलावाच्या वर्णनात म्हटले आहे की, हॉर्नेड नागा ह्युमन स्कलसाठी सुरुवातीची बोली 2,100 पौंड (सुमारे 23 लाख रुपये) ठेवण्यात आली आहे. तर, यासाठी कमाल कमाल 4,000 पौंड (सुमारे 43 लाख) बोली लागण्याचा अंदाज ऑक्शन हाउसने व्यक्त केला होता.