सुनक यांच्या पक्षाचे १४ वर्षांचे सरकार गेले, राजीनाम्याची घोषणा; ब्रिटनमध्ये लेबर पार्टी ४०० पार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2024 12:17 PM2024-07-05T12:17:06+5:302024-07-05T12:17:32+5:30
Britain Election Result Live Update: लेबर पार्टीला सत्तेत येण्यासाठी १४ वर्षांचा वनवास सहन करावा लागला आहे. याचबरोबर लिबरल डेमोक्रेट्सने ६० जागा, स्कॉटीश नॅशनल पार्टीने सात आणि रिफॉर्म युकेने चार जागा जिंकल्या आहेत. तर ग्रीन पार्टीने एकच जागा जिंकली आहे.
ब्रिटनमध्ये झालेल्या निवडणुकीचा निकाल जवळपास हाती आला आहे. १४ वर्षांपासून सत्तेत असलेल्या कंझर्व्हेटीव्ह पक्षाला ब्रिटिशांनी सत्तेबाहेर फेकले आहे. तर लेबर पार्टीला ४०० पार नेऊन ठेवले आहे. भारताशी संबंध असलेल्या ऋषी सुनक यांचा दारुण पराभव झाला आहे. ब्रिटनमध्ये एक्झिट पोल खरे ठरले असून सुनक यांचा पक्ष आतापर्यंत १११ जागाच जिंकू शकला आहे.
आतापर्यंत आलेल्या निकालानुसार लेबर पार्टी ४०५ जागा जिंकली आहे. ६५० पैकी ६२४ जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. लेबर पार्टीला सत्तेत येण्यासाठी १४ वर्षांचा वनवास सहन करावा लागला आहे. याचबरोबर लिबरल डेमोक्रेट्सने ६० जागा, स्कॉटीश नॅशनल पार्टीने सात आणि रिफॉर्म युकेने चार जागा जिंकल्या आहेत. तर ग्रीन पार्टीने एकच जागा जिंकली आहे.
धक्कादायक निकालामध्ये ब्रिटनच्या माजी पंतप्रधान लिझ ट्रस यांचा समावेश आहे. त्यांना पश्चिम नॉरफॉकमध्ये पराभत व्हावे लागले होते. सुनक यांच्यापूर्वी त्या पंतप्रधान होत्या. ऋषी सुनक मात्र उत्तर इंग्लंडमधून विजयी झाले आहेत. सुनक यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली हार स्वीकार केली आहे. तसेच पराभवाची जबाबदारी घेतली आहे. हाऊस ऑफ कॉमन्समध्ये 650 खासदार असतात. बहुमताचे सरकार स्थापन करण्यासाठी पक्षाला 326 जागांची आवश्यकता असते. पराभवाचे संकेत मिळाल्यानंतर पंतप्रधान ऋषी सुनक यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे.
ब्रिटनच्या निकालांवरून स्कॉटलंडमध्येही लेबर पार्टीच्या नेत्यांनी सरकार उलथविले जाणार असल्याचा दावा केला आहे. २०२६ मध्ये तिथेही निवडणुका होणार आहेत. यावेळी लेबर पार्टी ३० हून अधिक जागा जिंकेल असा दावा स्कॉटीश नेते अनस अन्वर यांनी केला आहे.