ब्रिटन : दहशतवादी हल्ल्यात मदतीला धावणारा खासदार ठरला हिरो

By admin | Published: March 23, 2017 01:49 PM2017-03-23T13:49:09+5:302017-03-23T13:49:09+5:30

ब्रिटनच्या संसदेबाहेर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या एका पोलीस अधिका-याचा जीव वाचवण्यासाठी खासदार तोबिआस एल्लवुड यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता पुर्ण प्रयत्न केला

Britain: Hero in the runner to help in terrorist attacks | ब्रिटन : दहशतवादी हल्ल्यात मदतीला धावणारा खासदार ठरला हिरो

ब्रिटन : दहशतवादी हल्ल्यात मदतीला धावणारा खासदार ठरला हिरो

Next
ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 23 - ब्रिटनच्या संसदेबाहेर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या एका पोलीस अधिका-याचा जीव वाचवण्यासाठी खासदार तोबिआस एल्लवुड यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता पुर्ण प्रयत्न केला. मात्र त्यांना यश मिळू शकलं नाही. तोबिआस एल्लवुड यांनी केलेल्या या प्रयत्नांचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे. लंडनमध्ये संसदेच्या इमारतीपासून काही अंतरावर एक दहशतवादी वेस्टमिंस्टर ब्रीजच्या दिशेने आला. यावेळी त्याने आपल्या हातातील चाकूने इमारतीच्या सुरक्षा रक्षकावर हल्ला करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात एक पोलीस अधिकारी गंभीर जखमी झाला. यानंतर तोबिआस एल्लवुड यांनी आपल्या ऑफिसमधून घटनास्थळी धाव घेतली आणि त्या पोलीस अधिका-याजवळ पोहोचले. पोलीस अधिकारी गंभीर जखमी झाला होता आणि त्याच्या शरिरातून सतत रक्तस्त्राव होत होता. 
 
(ब्रिटनमध्ये संसदेबाहेर दहशतवादी हल्ला, 5 ठार 40 जखमी)
(लंडन हल्ल्यात भारतीयांना हानी पोहोचलेली नाही - सुषमा स्वराज)
 
आधी लष्करात असणा-या तोबिआस एल्लवुड यांनी जखमी अधिका-याच्या जखमेवर हाताने दाब देत रक्तस्त्राव थांबवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. सोबतच तोंडावाटे जखमी अधिका-याला श्वास पुरवण्याचाही प्रयत्न करत होते. जोपर्यंत रुग्णवाहिका पोहोचली नाही तोपर्यंत तोबिआस एल्लवुड प्रयत्न करत होते असं एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं आहे. मात्र तोबिआस एल्लवुड यांचे प्रयत्न निष्फळ ठरले, आणि त्या अधिका-याचा मृत्यू झाला. 
सोशल मीडियावर तोबिआस एल्लवुड यांचे घटनास्थळावरील फोटो व्हायरल झाले असून यामध्ये ते पोलिसांसोबत बातचीत करताना दिसत आहेत. त्यांच्या चेह-यावर आणि हातावर रक्ताचे डागही दिसत आहेत. यानंतर तोबिआस एल्लवुड यांनी प्रसारमाध्यमांशी कोणताही संवाद न साधता पुन्हा आपलं कार्यालय गाठलं. सर्वजण तोबिआस एल्लवुड यांचं कौतुक करत आहेत. तोबिआस एल्लवुड 1991 ते 1996 दरम्यान रॉयल ग्रीन जॅकेटमध्ये कॅप्टन म्हणून कार्यरत होते. सरकामध्ये सामील होण्याआधी तोबिआस एल्लवुड लंडन स्टॉक एक्स्चेंजमध्ये काम करत होते. 
 
ब्रिटनच्या (युनायडेट किंग्डम) संसदेवरील दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न निष्फळ ठरला. बुधवारी संध्याकाळी संसदेबाहेरच्या परिसरात पादचाऱ्यांना कारने चिरडण्याची, गोळीबार आणि चाकूने भोकसणे अशा तीन वेगवेगळ्या घटना घडल्या. यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला असून 40 जण जखमी झाले आहेत. ठार झालेल्यांमध्ये एका हल्लेखोराचा आणि पोलीस अधिकाऱ्याचा सामवेश आहे. दरम्यान हा हल्ला दहशतवादी हल्ला असल्याच्या वृत्तास पोलिसांनी दुजोरा दिला.
 
गोळीबार झाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. संसदेचा परिसर बंद करण्यात आला.. तसेच, या ठिकाणी हाय अलर्ट जारी करण्यात आला . हाऊस ऑफ कॉमन्सच्या नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराला पोलिसांनी ठार केले असून, संसदेमध्ये बंदुकधारी पोलीस दाखल झाले . दरम्यान गोळीबार झाला तेव्हा संसदेमध्ये ब्रिटीश पंतप्रधानांसह 200 खासदार उपस्थित होते. या घटनेमुळे लंडनमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, ब्रिटनमध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक चोख करण्यात आली आहे.   
 
ब्रिटीश संसदेबाहेर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एकही भारतीय मृत अथवा जखमी झालेला नाही अशी माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी रात्री उशिरा दिली. आपण ब्रिटनमधील भारतीय दूतावासाच्या संपर्कात असून लंडनमध्ये राहणा-या भारतीयांना सर्व आवश्यक मदत उपलब्ध करुन देऊ असे स्वराज यांनी सांगितले. ज्या व्यक्तींना मदत आणि माहिती हवी आहे त्यांच्यासाठी परराष्ट्रमंत्रालयाने 02086295950 आणि 02076323035 हे दोन दूरध्वनी क्रमांक प्रसिद्ध केले आहेत.
 

Web Title: Britain: Hero in the runner to help in terrorist attacks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.