ब्रिटनमध्ये हवेत एक लाख ट्रक ड्रायव्हर्स; व्यापार-अर्थकारणाला 'ब्रेक', ट्रॅफिकही 'जॅम'

By Rishi Darda | Published: October 19, 2021 05:14 AM2021-10-19T05:14:20+5:302021-10-19T05:14:43+5:30

ब्रिटनमध्ये सध्या ट्रक ड्रायव्हर्सच्या टंचाईनं उद्योगधंदे, व्यापार आणि अर्थव्यवस्थेवरही परिणाम होऊ लागला आहे. तज्ज्ञांच्या मते, ब्रिटनमध्ये सध्या एक लाखापेक्षाही जास्त ट्रक ड्रायव्हर्सची टंचाई जाणवते आहे.

Britain need One lakh truck drivers | ब्रिटनमध्ये हवेत एक लाख ट्रक ड्रायव्हर्स; व्यापार-अर्थकारणाला 'ब्रेक', ट्रॅफिकही 'जॅम'

ब्रिटनमध्ये हवेत एक लाख ट्रक ड्रायव्हर्स; व्यापार-अर्थकारणाला 'ब्रेक', ट्रॅफिकही 'जॅम'

googlenewsNext

>> ऋषी दर्डा

आजकाल आपण सगळेच ‘टंचाई’च्या व्यवस्थेत जगत आहोत. इंधनाची टंचाई, कोळशाची टंचाई, पाण्याची टंचाई, जमिनीची टंचाई, अन्नधान्याची टंचाई, रोजगाराची टंचाई. चांगल्या रस्त्यांची टंचाई, शाळांची टंचाई, शिक्षकांची टंचाई. अगदी कुठलाही विषय घेतला तरी त्या कमतरतेला आज सगळ्यांनाच सामोरं जावं लागतंय. अख्ख्या जगात कुणीही त्यातून सुटलेलं नाही. 

या टंचाईत आता भर पडली आहे ती ट्रक ड्रायव्हर्सची. ब्रिटनमध्ये सध्या ट्रक ड्रायव्हर्सच्या टंचाईनं उद्योगधंदे, व्यापार आणि अर्थव्यवस्थेवरही परिणाम होऊ लागला आहे. तज्ज्ञांच्या मते, ब्रिटनमध्ये सध्या एक लाखापेक्षाही जास्त ट्रक ड्रायव्हर्सची टंचाई जाणवते आहे. त्यामुळे दळणवळणावर त्याचा प्रचंड परिणाम झाला आहे, तर काही ठिकाणी ट्रक, कंटेनर्स जागच्या जागी उभे असल्याने ट्रॅफिक जामची समस्याही उद्भवली आहे. 

ब्रिटनच्या ‘रोड हॉलेज असोसिएशन’च्या (आरएचए) म्हणण्यानुसार ब्रिटनमध्ये कधी नव्हे ती ड्रायव्हर्सची मोठी कमतरता सध्या जाणवते आहे. परिणामी उद्योगधंद्यांना माल वितरणात अडचणी निर्माण होत आहेत. अनेक कंपन्यांचा माल एकाच जागी पडून आहे. त्याचा परिणाम रोजगारावरही होत आहे. अनेक कष्टकरी कामगारांना त्यामुळे आपल्या नोकरीवर पाणी सोडावं लागलं आहे. कारण त्यांच्या हाताला काही कामच उरलेलं नाही. कारण भरलेले ट्रक ना रिकामे करता येत, ना नव्या ट्रक्समध्ये माल भरता येत. त्यामुळे जागेच्या टंचाईचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
 
एवढंच नाही, अनेक गॅस स्टेशन्स आणि पेट्रोल-डिझेल पंपही कोरडे पडले आहेत आणि तिथेही वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. इंधनाची वाहतूक करणारे ट्रक्स, कंटेनर्स चालविण्यासाठी ड्रायव्हर्सची कमतरता असल्याने रिफायनरीजपासून पेट्रोल पंपांपर्यंत इंधन पोहोचविण्यात प्रचंड अडचणी येत आहेत. पेट्रोल पंपांवर इंधन नसल्यानं पंपचालकांनी इंधनाचं रेशनिंगही सुरू केलं आहे. त्यामुळे कोणालाच पुरेसं इंधन मिळत नाहीय. ज्या पंपांवर इंधन उपलब्ध आहे, त्या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. 

यासंदर्भात सरकार आणि इंधन कंपन्यांचं म्हणणं आहे, यंदा अत्यंत विचित्र अशी परिस्थिती उद्भवली आहे. कारण इंधनाची टंचाई बिलकूल नाही. प्रत्येकाला पुरेल आणि लागेल तेवढं इंधन सध्या उपलब्ध आहे, पण ते वाहून नेण्यासाठी ड्रायव्हर्स नसल्यानं अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. इंधनाची कमतरता नसतानाही इंधनाचं रेशनिंग करावं लागत आहे आणि लोकांच्या रोषालाही आम्हाला बळी पडावं लागत आहे. ट्रक ड्रायव्हर्सच्या टंचाईमुळे आणखी एक विचित्र अशी परिस्थिती ब्रिटनमध्ये तयार झाली आहे. ब्रिटनमध्ये ‘पोर्ट ऑफ फेलिक्स्टो’ हे सर्वांत मोठं बंदर. युरोपातलं हे आठव्या क्रमांकाचं तर जगातलं ४३ व्या क्रमांकाचं अतिभव्य असं बंदर  ८३६० एकर एवढ्या प्रचंड परिसरात हे बंदर पसरलेलं आहे; पण सध्या या बंदरावरही तब्बल दीड लाख शिपिंग कंटेनर्स उभे आहेत, त्यामुळे आतापर्यंतचा सर्वांत मोठा ट्रॅफिक जाम इथे पाहायला मिळतो. ब्रिटनमधून जाणाऱ्या आणि येणाऱ्या तब्बल ५० टक्के कंटेनर्सची व्यवस्था याच बंदरातून होते. प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही हा ट्रॅफिक जाम सरकारला हटविता आलेला नाही. ड्रायव्हर्सच नाहीत, तर कंटेनर्स हलविणार कसे? अधिक वेतन देऊन ड्रायव्हर्सना बोलावलं जात आहे, पण तरीही  फारसा फरक पडलेला नाही. कारण कंटेनर्स चालवू शकतील अशा ड्रायव्हर्सची संख्याही ब्रिटनमध्ये अतिशय कमी आहे. पोर्टच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे, सध्या आम्हाला कोणताही पर्याय समोर दिसत नाही. बरेच दिवस झाले, या ट्रॅफिक जाममुळे आम्ही वैतागलो आहोत; पण कितीही प्रयत्न केला, अगदी परदेशातून जरी कंटेनर ड्रायव्हर्स बोलावले, तरीही अजून किमान चार-पाच महिने तरी हे ‘ट्रॅफिक’ सुरळीत होण्याची शक्यता नाही. फेब्रुवारी २२ अखेर बंदराला थोडाफार मोकळा श्वास घेता येईल अशी  आशा आहे. 

याचा सगळ्यात मोठा परिणाम येऊ घातलेल्या नाताळच्या सणावर होणार आहे.  नाताळपर्यंत  टंचाई आणखी वाढेल आणि नाताळ सणांशी संबंधित वस्तूंची महागाई तब्बल चार पटींनी वाढेल. जनता आताच त्यामुळे त्रस्त झाली आहे. 

परदेशातून ड्रायव्हर्सची आयात!

ड्रायव्हर्सच्या टंचाईने परिस्थिती आणखी बिघडू नये यासाठी ब्रिटन सरकारनं आता परदेशांतून ड्रायव्हर्स ‘आयात’ करण्याचा निर्णय घेतला आहे.  ‘टेम्पररी व्हिसा’ घेऊन येत्या काही दिवसांत किमान पाच हजार कंटेनर ड्रायव्हर्स परदेशातून ब्रिटनमध्ये आलेले असतील. ड्रायव्हर्सची ही संख्या पुरेशी नसली, तरी आणीबाणीच्या परिस्थितीतून आम्ही थोडे तरी बाहेर पडू असं त्यांचं म्हणणं आहे. परदेशातून ड्रायव्हर्स तातडीनं ब्रिटनमध्ये यावेत, यासाठी त्यांना वाढीव पगार, भत्ता याशिवाय विविध सोयीसुविधांचंही आमिष दाखविलं जात आहे. जगभरातल्या कंटेनर ड्रायव्हर्सनी आमच्याशी संपर्क साधावा, असं आवाहनही कंपन्या आणि सरकारनं केलं आहे.

(लेखक लोकमत समूहाचे जॉईंट एमडी व एडिटोरियल डायरेक्टर आहेत.)

Web Title: Britain need One lakh truck drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.