कोविडचा नवीन व्हेरिएंट ब्रिटनमध्ये करणार कहर? बार्बेनहाइमर इफेक्ट ठरणार मुख्य कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 18:47 IST2023-08-04T18:47:44+5:302023-08-04T18:47:56+5:30
या नवीन व्हेरिएंटचे नाव EG5.1 आहे, ज्यामुळे ब्रिटनमध्ये कहर होत असल्याचे म्हटले जात आहे. पूर्वी या व्हेरिएंटला एरिस म्हणत होते.

कोविडचा नवीन व्हेरिएंट ब्रिटनमध्ये करणार कहर? बार्बेनहाइमर इफेक्ट ठरणार मुख्य कारण...
लंडन : ब्रिटनमध्ये कोविडचा एक नवीन व्हेरिएंट सापडला आहे. मात्र, यामुळे घाबरण्याची गरज नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तर ब्रिटनच्या आरोग्य सुरक्षा एजन्सीच्या (UKHSA) अधिकाऱ्यांनी याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. मे महिन्यापासून नवीन व्हेरिएंटची सात प्रकरणे आढळली आहेत. तसेच, लोकांना याची लागण होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे, असे UKHSA च्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. चिंतेची बाब अशी आहे की, देश एका नव्या लाटेच्या तडाख्यात येणार आहे. या नवीन व्हेरिएंटचे नाव EG5.1 आहे, ज्यामुळे ब्रिटनमध्ये कहर होत असल्याचे म्हटले जात आहे. पूर्वी या व्हेरिएंटला एरिस म्हणत होते.
दरम्यान, शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार, नवीन कोविड व्हेरिएंट जुन्यापेक्षा जास्त धोकादायक असण्याची लक्षणे नाहीत. अधिकारी त्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. तसेच, तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, या नवीन स्ट्रेनच्या प्रादुर्भावमध्ये बार्बेनहाइमर इफेक्ट देखील आहे (बार्बेनहाइमर हा शब्द नव्याने प्रदर्शित झालेल्या ओपेनहाइमर आणि बार्बी चित्रपटापासून घेतले आहेत). याशिवाय, अलीकडचे खराब हवामान आणि लोकांची कमकुवत प्रतिकारशक्ती यामुळे त्याचा प्रसार होण्यास हातभार लागला आहे.
याचबरोबर, रीडिंग युनिव्हर्सिटीचे मायक्रोबायोलॉजिस्ट डॉ. सायमन क्लार्क म्हणाले, 'कोविडमध्ये सतत बदल आणि परिस्थितीशी जुळवून घेणे चालू राहील. त्यामुळे त्याच्या नवीन व्हेरिएंटमुळे आपल्याला घाबरण्याची आणि काळजी करण्याची गरज नाही. लसीकरणामुळे लोकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होत आहे. जरी संसर्गाची संख्या वाढत आणि कमी होत असली तरी लोकांमध्ये रुग्णालयात दाखल होण्याची आणि मृत्यूची भीती कमी होत आहे.
दुसरीकडे, प्रोफेसर पॉल हंटर म्हणाले की, कोविडचा नवीन व्हेरिएंट मागीलपेक्षा 20.5% वेगाने पसरत आहे. हा व्हेरिएंट नुकताच प्रदर्शित झालेला बार्बी आणि ओपेनहायमर चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहात जाणाऱ्या लोकांमध्ये वेगाने पसरण्याचा धोका आहे, असे प्रोफेसर पॉल हंटर यांनी सांगितले. तसेच, याला बार्बेनहाइमर इफेक्ट असेही म्हणतात. याशिवाय खराब हवामान देखील संसर्गाचे प्रमाण वाढण्यास कारणीभूत असल्याचे म्हटले जाते.