नर्सचे धक्कादायक कृत्य; हवेचे 'इंजेक्शन' देऊन 7 बाळांना मारले, 10 चिमुकल्यांना मारण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 01:45 PM2022-10-13T13:45:58+5:302022-10-13T13:46:42+5:30
ब्रिटेनमधील एका 32 वर्षीय नर्सवर 7 चिमुकल्यांची हत्या आणि 10 जणांना मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
Britain Crime News: ब्रिटनमधील एका नर्सवर 7 लहान मुलांच्या हत्येचा आरोप आहे. घटना 2015ची असून, तिच्यावर आणखी 10 मुलांना मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही आहे. मंगळवारी या प्रकरणी सुनावणी झाली. यात एका मुलाच्या आईने सांगितले की, ती 4 ऑगस्ट 2015 रोजी नॉर्थ वेस्ट इंग्लंडमधील चेस्टर हॉस्पिटलच्या निओ-नेटल युनिटमध्ये आली, तेव्हा तिचा मुलगा अस्वस्थ दिसत होता. त्याच्या तोंडातून रक्त येत होते आणि नर्स लुसी लेटबी तिथेच होती. त्या मुलाच्या शरीरात रिकामे इंजेक्शन दिल्याचे आढळून आले.
32 वर्षीय नर्सवर आरोप
मिळालेल्या माहितीनुसार, 32 वर्षीय नर्स लुसी लेटबीवर मुलांच्या हत्येचा आरोप आहे. पण, अद्याप आरोपी नर्सने खुनाची कबुली दिलेली नाही. या नर्सवर आणखी 10 मुलांना मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही आहे. सुनावणीदरम्यान, वकिलाने सांगितले की, लेटबीने आपला गुन्हा लपवण्यासाठी खोट्या नर्सिंग नोट्सही बनवल्या होत्या. पहिल्या बाळाचा मृत्यू 5 ऑगस्ट 2015 रोजी झाला होता. त्यानंतर लेटबीने आणखी एका जुळ्या भावांना इन्सुलिनचे इंजेक्शन देऊन मारण्याचा प्रयत्न केला.
नर्सने अनेकांना मारण्याचा प्रयत्न केला
विशेष म्हणजे, डॉक्टरांनी त्या वॉर्डातील एकाही मुलाला इन्सुलिन देण्यास सांगितले नव्हते. मुलांना इंजेक्शन दिले, तेव्हा लेटबी त्याच खोलीत होती. चेस्टर हॉस्पिटलच्या काउंटेसच्या निओ नेटल युनिटमध्ये मुलांचा मृत्यू झाला तेव्हा, सर्व प्रकरणांमध्ये फक्त लेटबी तिथे उपस्थित होती. या रुग्णालयात जून 2015 ते जून 2016 या कालावधीत 5 मुले व 2 मुलींची हत्या झाली असून 5 मुले व 5 मुलींच्या हत्येचा प्रयत्न झाला आहे. या प्रकरणाची सध्या सुनावणी सुरू आहे.