ब्रिटनची १९४७ मोमेंट! पाक वंशाचे हमजा युसुफ UK तोडण्याच्या, तर ऋषि सुनक वाचवण्याच्या प्रयत्नात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 08:53 AM2023-03-31T08:53:17+5:302023-03-31T08:54:07+5:30

असं म्हणतात की इतिहासाची कधी कधी पुनरावृत्ती होते, पाहा नक्की युकेच्या बाबतीत काय घडतंय?

Britain s 1947 Moment Pakistani origin Hamza Yusuf trying to break UK need Scotland different country while Rishi Sunak to save scotland referendum | ब्रिटनची १९४७ मोमेंट! पाक वंशाचे हमजा युसुफ UK तोडण्याच्या, तर ऋषि सुनक वाचवण्याच्या प्रयत्नात

ब्रिटनची १९४७ मोमेंट! पाक वंशाचे हमजा युसुफ UK तोडण्याच्या, तर ऋषि सुनक वाचवण्याच्या प्रयत्नात

googlenewsNext

असं म्हणतात की इतिहासाची कधी कधी पुनरावृत्ती होते. भारताची फाळणी करून देणारे ब्रिटीश साम्राज्यवादी पंतप्रधान क्लेमेंट अॅटली आणि व्हाइसरॉय माउंटबॅटन यांनी क्वचितच कल्पना केली असेल की भारताच्या फाळणीनंतर केवळ ७५ वर्षांनी ब्रिटनच्या फाळणीवर गंभीर चर्चा होईल. त्यातच ही फाळणी थांबवण्याची किंवा पूर्ण करण्याची जबाबदारी भारतीय वंशाच्या आणि पाकिस्तानी वंशाच्या नेत्याच्या हातात आहे, हाही नियतीचा न्याय आहे.

आज भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे भारतीय वंशाचे हिंदू आहेत आणि ब्रिटनपासून वेगळं होण्याची मागणी करणारे स्कॉटलंडचे फर्स्ट मिनिस्टर पाकिस्तानी वंशाचे मुस्लिम हमजा युसूफ आहेत. हमजा युसूफ हे गेल्या सोमवारीच स्कॉटलंडचे फर्स्ट मिनिस्टर झाले आहेत. फर्स्ट मिनिस्टर म्हणजे त्या ठिकाणचे पंतप्रधान. याचा अर्थ स्कॉटलंडचे सर्वोच्च नेते.

ब्रिटनची १९४७ मोमेंट
स्कॉटलंड अनेक वर्षांपासून ब्रिटनकडून स्वतंत्र अस्तित्वाची मागणी करत आहे. निवडणूक प्रचारादरम्यान, हमजा युसूफ यांनी या वर्षानुवर्ष सुरु असलेल्या जुन्या स्कॉटिश विषयाला आणि भावनांना बरीच हवा दिली. जर आपण निवडणूक जिंकलो तर ते स्कॉटलंडला ब्रिटनपासून वेगळे करून स्वतंत्र देश बनवण्याच्या दिशेने पावलं उचलू असंही त्यांनी प्रचारादरम्यान म्हटलं. हमजा युसूफ यांच्या या आवाहनाला लोकांचा जोरदार पाठिंबा मिळाला आणि ते निवडून आले. परंतु जेव्हा ते ब्रिटीश पंतप्रधानांशी स्कॉटलंडला ब्रिटनपासून वेगळे करण्याच्या त्यांच्या अजेंडाबद्दल बोलले तेव्हा ऋषी सुनक यांनी त्यांना सडेतोड उत्तर दिलं आणि याला पूर्णपणे नकार दिला.

आज ब्रिटनमध्येही काही लोक स्वत:साठी वेगळ्या देशाची मागणी करत आहेत. पाकिस्तानी वंशाच हमजा युसुफ यांना स्कॉटलंडला ब्रिटनपासून वेगळं करायचं आहे, तर भारतीय वंशाचं ब्रिटिश पंतप्रधान या देशाचे विभाजन होऊ न देण्यावर ठाम आहेत. काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी एका ट्विटमध्ये या परिस्थितीची तुलना १९४६-४७ शी केली आहे.

का व्हायचंय वेगळं?
स्कॉटलंडला ब्रिटनपासून वेगळं का व्हायचंय? हे समजून घेण्यासाठी आधी ब्रिटनची रचना आणि वसाहत समजून घ्यावी लागेल. सर्वप्रथम, जगाच्या नकाशावर ग्रेट ब्रिटन कुठे आहे हे जाणून घेऊ? ब्रिटन युरोप खंडाच्या उत्तर-पश्चिम किनारपट्टीवर वसलेलं आहे. युनायटेड किंगडमचे पूर्ण नाव युनायटेड किंगडम ऑफ ग्रेट ब्रिटन अँड नॉर्दर्न आयलंड आहे. चार प्रांतांनी बनलेला हा देश आहे. हे देश आहेत इंग्लंड, वेल्स, उत्तर आयर्लंड आणि स्कॉटलंड. पूर्वी सदर्न आयर्लंड देखील ग्रेट ब्रिटनचा एक भाग होता परंतु १९२२ मध्ये तो एक वेगळा देश बनला.

भलेही एक युकेच्या कॉमन आयडेंटीटी अंतर्गत हे एक असले तरी त्यांची भाषा आणि त्यांची ओळखही आहे. संपूर्ण युनायटेड किंगडमची अधिकृत भाषा इंग्रजी आहे, परंतु वेल्सची अधिकृत भाषा वेल्श आहे. स्कॉटलंडमध्ये स्कॉटिश भाषा बोलली जाते.

१७०७ पासून ब्रिटनसोबत
स्कॉटलंड १७०७ पासून ब्रिटनचा भाग आहे. पण तरीही १७०७ मध्ये स्कॉटलंडच्या राष्ट्रवाद्यांनी आपल्या देशाची ओळख जोडून ब्रिटनमध्ये विलीन होण्यास विरोध केला. पण स्कॉटलंडच्या संसदेत युनियनचे समर्थक जास्त होते. हे उच्चभ्रू वर्ग आणि व्यापारी वर्गातील लोक होते. इंग्लंडबरोबर त्यांचे हितसंबंध वाढले होते. म्हणून स्कॉटलंड इंग्लंडबरोबर सामील झाला. स्कॉटलंडमध्ये बंड आणि आंदोलन झालं पण ते चिरडलं गेलं.

औद्योगिक क्रांतीच्या काळात वेगळ्या स्कॉटलंडची मागणी कमी झाली. पण २० व्या शतकात पुन्हा मागणी सुरू झाली. पहिल्या महायुद्धानंतर, आयर्लंडने स्वतंत्र देशाची मागणी पूर्ण केली. परंतु यात स्कॉटलंडला यश आले नाही. मात्र मागणी सुरूच राहिली.

स्कॉटलंडची वेगळी संसद
१९९७ मध्ये, स्कॉटलंडच्या स्वतंत्र संसदेच्या मागणीसाठी सार्वमत घेण्यात आलं. यामध्ये स्कॉटलंडला यश मिळालं. स्कॉटलंडनं स्वतःचं सरकार स्थापन केलं, १९९९ मध्ये स्कॉटलंडची राजधानी एडिनबर्ग येथे संसदेची पहिली बैठक झाली. ग्रेट ब्रिटनने स्कॉटिश संसदेला आरोग्य, शिक्षण, शेती या विषयांवर कायदे करण्याचे अधिकार दिले, परंतु वित्त, परराष्ट्र धोरण, संरक्षण यासारखे महत्त्वाचे मुद्दे ब्रिटिश संसदेकडेच राहिले. हमजा युसूफ हे या संसदेचे फर्स्ट मिनिस्टर ठरले आहेत. असं म्हणता येईल की स्कॉटलंडचं सरकार हे सार्वभौम सरकार नसल्यामुळं, येथील चीफ एक्झिक्युटिव्ह यांना पंतप्रधान नाही तर फर्स्ट मिनिस्टर म्हटलं जातं.

का व्हायचंय वेगळं?
५५ लाखांच्या लोकसंख्येसह, स्कॉटलंडचा यूकेच्या लोकसंख्येचा 8 टक्के वाटा आहे. लंडनमध्ये बसून घेतले जाणारे निर्णय स्कॉटलंडच्या हिताचे नाहीत, असं स्कॉटलंडला वाटतं. द इकॉनॉमिस्टच्या २०२० च्या अहवालानुसार, इंग्लंड हा स्कॉटलंडचा सर्वात मोठा ट्रेडिंग पार्टनर आहे. स्कॉटलंडमध्ये बनवलेल्या वस्तूंपैकी ६० टक्के वस्तू इंग्लंडमध्ये विकल्या जातात, मात्र याचा पुरेपूर लाभ मिळत नसल्याचं स्कॉटलंडला वाटतं. पंतप्रधान सुनक हमजा यांच्यासोबत महागाई आणि नोकऱ्यांसारख्या मुद्द्यांवर एकत्र काम करण्यास तयार आहेत. पण सार्वमतावर त्यांचा कोणताही विचार नाही, असं ब्रिटनच्या पंतप्रधान कार्यालयानं  यावर स्पष्ट केलं.

Web Title: Britain s 1947 Moment Pakistani origin Hamza Yusuf trying to break UK need Scotland different country while Rishi Sunak to save scotland referendum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.