Coronavirus : भारताला देण्यासाठी आमच्याकडे अधिकचे लसीचे डोस नाही; ब्रिटनचं स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 04:18 PM2021-04-29T16:18:56+5:302021-04-29T16:24:13+5:30
Coronavirus In India : सध्या भारतात मोठ्या प्रमाणात होत आहे कोरोनाबाधितांची नोंद. ब्रिटनकडून लसींव्यतिरिक्त अन्य वैद्यकीय वस्तूंच्या पुरवठ्याला सुरूवात
सध्या भारतात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं ३ लाखांच्या वर कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. अशा परिस्थितीत देशातील आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण येताना दिसत आहे. तर दुसरीकडे कोरोनाचा सामना करण्यासाठी सध्या लसीकरण हा एकमेव पर्याय असल्याचंही म्हटलं जात आहे. भारतातही लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. परंतु अनेक ठिकाणी लसीकरणासाठी लसी उपलब्ध नसल्याचंही सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे ब्रिटनसारखा देशही कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. अशा परिस्थितीत आपल्याकडे कोरोना लसीचे अधिकचे डोस नाहीत, जे आपण या परिस्थितीत भारत किंवा अन्य देशांना देऊ शकू, असं स्पष्टीकरण ब्रिटननं दिलं आहे. बुधवारी ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हेनकॉन यांनी यासंदर्भातील स्पष्टीकरण दिलं.
"आमच्याकडून भारताला ४९५ ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर्स, १२० नॉन इनव्हेजिव्ह व्हेंटिलेटर्स, २० मॅन्युअल व्हेंटिलेटर्सचा पुरवठा केला जात आहे. मंगळवारी सकाळी ब्रिटनकडून ९५ ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर्स, १०० व्हेंटिलेटर्सची पहिली खेप भारताला पोहोचली आहे," अशी माहिती ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या प्रवक्त्यांनी दिली. "ज्या देशांना आवश्यकता आहे अशा देशांना वैद्यकीय साहित्यांचा पुरवठा करणार असल्याचं आम्ही फेब्रुवारी महिन्यात आश्वासन दिलं होतं. ज्या गोष्टी आमच्याकडे अधिक प्रमाणात उपलब्ध असतील त्यांचा पुरवठा केला जाईल. सध्या आमचं प्राधान्य ब्रिटनचे नागरिक आहेत. यामुळे सध्या आमच्याकडे लसीचे अतिरिक्त डोस नाहीत. परंतु आम्ही सातत्यानं समीक्षा करत आहोत. जोपर्यंत या महासाथीपासून लोकं सुरक्षित नाहीत तोवर कोणीही सुरक्षित नाहीत. म्हणूनच ब्रिटननं कोरोना महासाथीचा सामना करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. तसंच भारतालाही संबंधित उपकरणं आणि ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर्सचा पुरवठा केला आहे," असं त्यांनी नमूद केलं.
भारतीय वंशाच्या नागरिकांकडूनही मदत
यादरम्यान ब्रिटनमध्ये वास्तव्यास असलेल्या भारतीय वंशाच्या लोकांनीही मोठ्या प्रमाणात निधी गोळा केला आहे. ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर्ससहित अन्य वस्तूंच्या पुरवठ्यासाठी हा निधी खर्च केला जाईल. आतापर्यंत ब्रिटन, अमेरिका, फ्रान्स, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबियासारख्या देशांनी भारताकडे मदतीचा हात पुढे केला आहे.