ऑनलाइन लोकमत -
लंडन, दि. 24 - ब्रिटनमधील जनतेने ऐतिहासिक कौल देत युरोपियन महासंघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. युरोपिअन महासंघात राहावं की नाही ? यासाठी घेण्यात आलेल्या जनमत चाचणीत लोकांनी बाहेर पडण्याच्या म्हणजेच 'Leave'च्या बाजूने कौल दिला आहे. ब्रिटनमधील 51.9 टक्के लोकांनी बाहेर पडण्याच्या म्हणजेच 'Leave'च्या तर 48.1 टक्के लोकांनी राहण्याच्या म्हणजेच 'Remain'च्या बाजूने मत दिलं आहे. हा ऐतिहासिक निकाल असून याचा परिणाम जागतिक राजकारण आणि अर्थकारणावर होणार आहे..
जनमत चाचणीत 4 कोटी 65 लाख 1 हजार दोनशे 41 (4,65,01,241) म्हणजेच 71.9 टक्के लोकांनी सहभाग घेतला होता. ब्रिटनच्या निवडणुकीत 1992 पासून झालेल्या मतदानाचा हा उच्चांक आहे.
ब्रिटननं युरोपियन युनियनमध्ये राहावं की नाही, याचा निर्णय घेण्यासाठी ही जनमत चाचणी झाली. याआधी 2014 साली स्कॉटलंडनं ब्रिटनमध्ये राहावं की नाही, यासाठी जनमत चाचणी झाली होती. तर 1975 साली झालेल्या जनमत चाचणीत ब्रिटननं युरोपियन इकॉनॉमिक कम्युनिटीत राहण्याच्या बाजूनं कौल दिला होता. पण त्यानंतरच्या काळात युरोपियन राष्ट्रसंघटनेचं रूप बरंच बदललं आहे. हे बदल आजच्या ब्रिटनला मान्य आहेत का, हे पडताळून पाहण्यासाठी ही जनमत चाचणी घेण्यात आली.
ब्रिटिश आणि एक्झिट या शब्दांना एकत्र करून 'ब्रेक्झिट' हा शब्द तयार झाला आहे. ब्रिटनची युरोपियन युनियनमधून एक्झिट असा त्याचा अर्थ होतो. युरोपियन युनियन हा 28 देशांचा समूह असून, त्यात पश्चिम युरोपातील ब्रिटन, फ्रान्स, जर्मनीसारख्या मुख्य देशांचा समावेश आहे. या 28 देशांचे नागरिक इतर कुठल्याही सदस्य देशात मुक्तपणे प्रवास आणि व्यापार, नोकरी करू शकतात. त्यासाठी युरोपियन युनियनमध्ये युरो हे स्वतंत्र चलनही अस्तित्वात आहे.
लंडन आणि स्कॉटलंडने राहावं यासाठी मतदान केलं आहे. मात्र उत्तर इंग्लंडमधील निकाल विरोधात गेले आहेत. दरम्यान ब्रेक्झिटमुळे पाऊंडने 31 वर्षातील निच्चांक गाठला होता. डॉलरच्या तुलनेत पाऊंड 9 टक्क्यांनी घसरला होता. सेन्सेक्सवरही याचा परिणाम झाला असून 1000 अंकांनी गडगडला होता. 26 हजाराच्या खाली सेन्सेक्स आला होता. निफ्टी आणि रुपयामध्येदेखील घसरण झाली होती. जपानमधील शेअर बाजारात ८ टक्क्यांनी घसरण झाली. तिथे सर्किट ब्रेकर लावून बाजाराचे काम दहा मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले होते.
भारतावर परिणाम
भारत, पाकिस्तान, बांगला देशातील उद्योजकांचा बाहेर पडण्याच्या भूमिकेला पाठिंबा आहे. कारण महासंघातील स्थलांतरितामुळे आशियाई लोकांना येथे नोकऱ्या मिळणे कठीण झाले आहे. महासंघातून बाहेर पडल्यास त्यांच्यावर नियंत्रण येईल आणि आपल्या नातेवाईक, मित्र मंडळींना इंग्लंडमध्ये आणता येईल अशी आशियाई नागरीकांची आशा आहे.इंग्लंड महासंघातून बाहेर पडल्यास त्याचा भारतावर देखील परिणाम होणार आहे. युरोपियन महासंघाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे जगभरातील शेअरबाजारांवर त्याचा परिणाम होणार असून भारताला अर्थव्यवस्थेला काही प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे.
महासंघाचे काय
जर इंग्लंड महासंघातून बाहेर पडल्या त्याच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल. कारण इंग्लंडमधील ब्रे्रक्झीट मागणीच्या पार्श्वभूमीवर फ्रान्समध्ये सुद्धा फ्रेक्झिटच्या मागणीने डोके वर काढले आहे. तसेच आणखी काही देश यातून बाहेर पडण्याच्या किंवा निर्वासिंताना रोखण्याच्या मागणीवर अडले आहे. असे झाले तर हा जागतिक अर्थव्यवस्थेला मोठ्या हादरा बसेल. १९३० च्या जागतिक महामंदी सारखी स्थिती निर्माण होण्याचा धोका आहे.
Web Title: Britain's historic decision to exit the European Union
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.