हिमवादळामुळे ब्रिटनला आठवडाभरात अब्जावधी रुपयांचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 01:43 AM2018-03-05T01:43:01+5:302018-03-05T01:43:01+5:30
गेल्या आठवड्यात आलेल्या हिमवादळाचा तडाखा एवढा मोठा होता की, ब्रिटनची अर्थव्यवस्थाही हादरून गेली आहे. या वादळामुळे आठवडाभर वाहतूक विस्कळीत झाली, अनेक व्यवहार थांबले, दुकाने बंद पडली
गेल्या आठवड्यात आलेल्या हिमवादळाचा तडाखा एवढा मोठा होता की, ब्रिटनची अर्थव्यवस्थाही हादरून गेली आहे. या वादळामुळे आठवडाभर वाहतूक विस्कळीत झाली, अनेक व्यवहार थांबले, दुकाने बंद पडली, यामुळे एकाच आठवड्यात अब्जावधी रुपयांचा फटका बसला आहे. गेल्या आठवड्यात प्रत्येक दिवशी ९० अब्ज रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
काय झाले होते गेल्या आठवड्यात
हिमवादळाने ब्रिटनला मोठा तडाखा दिला होता. त्यामुळे जनजीवन संपूर्णपणे विस्कळीत झाले होते. अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद ठेवावी लागली होती. दुकानांना टाळे लावावे लागले होते. इमारतींचे बांधकाम ठप्प झाले होते. वाहतूक व्यवसायही थांबला होता.
घराबाहेर पडू नये, असा इशारा प्रशासनाने दिल्यामुळे अनेक हॉटेल्सचे बुकिंग रद्द झाले होते.
जीडीपीही घसरेल : वादळी हवामानामुळे देशाच्या आर्थिक गतीलाही खिळ बसू शकते. जीडीपी ०.१ टक्का ते ०.२ टक्का कमी होऊ शकतो, असा अंदाज अर्थतज्ज्ञ होवर्ड आर्चर यांनी वर्तविला आहे.