ब्रिटनच्या निवडणुकीला मिळाला इंडियन तडका!
By admin | Published: May 4, 2015 12:29 AM2015-05-04T00:29:16+5:302015-05-04T00:29:16+5:30
इंग्लंडमधील निवडणुकीचा संघर्ष पराकोटीला पोहोचलेला असताना या निवडणुकीत सहभागी सर्वच राजकीय पक्ष भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी इंडियन फंडे
लंडन : इंग्लंडमधील निवडणुकीचा संघर्ष पराकोटीला पोहोचलेला असताना या निवडणुकीत सहभागी सर्वच राजकीय पक्ष भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी इंडियन फंडे अजमावत आहेत. दरम्यान, निवडणूक पूर्व चाचणीत ब्रिटीश संसद त्रिशंकू अवस्थेकडे जात असल्याचे चित्र आहे.
निवडणुकीच्या प्रचारात बॉलीवूड स्टाईलची गाणी असून, भारतीय पद्धतीने पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांची हिंदी आरतीही आहे. ब्रिटनमध्ये १५ लाख भारतीय मतदार असून, त्यांना आकर्षित करण्याची चढाओढ राजकीय पक्ष करीत आहेत. राजकीय नेते देशात ठिकठिकाणी असलेले गुरुद्वारा व मंदिरांना भेट देत आहेत. बॉलीवूड कलाकार अभिषेक बच्चनही भारतीय उमेदवार कीथ वाझ यांच्या प्रचारार्थ उतरला आहे.
निवडणुकीचे निकाल त्रिशंकू लागण्याचीच शक्यता आहे, असे भारतीय उद्योजक स्वराज पॉल यांनी म्हटले आहे. इंग्लंडमधील स्थलांतरित मतदारांत भारतीय सर्वाधिक आहेत.
राष्ट्रकुल सदस्य असल्यानेही मतदारांची संख्या वाढत असून, मूळ भारतीय मतदार ६ लाख १५ हजारांच्या आसपास जातात. भारतीय उद्योजक जी.पी. हिंदुजा यांच्या मते भारतीय मतदार गटाने मतदान करीत नाहीत. प्रत्येक जण आपल्याला योग्य वाटेल त्या मतदाराला मतदान करतो.
मतदानपूर्व सर्वेक्षणाचे निकाल टोरी पक्षाकडे पर्यायाने पंतप्रधान कॅमेरून यांना दिलासा देणारे ठरत आहेत.
यू गव्ह.च्या पहिल्या मतदार सर्वेक्षणात कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाला ३४ टक्के मते दाखविली असून, लेबर पक्ष एक टक्का कमी आहे. गुरुवारी ७ मेला होणाऱ्या निवडणुकीत कॉन्झर्व्हेटिव्ह पक्ष जिंकल्यास पंतप्रधान कॅमेरून विजयाची घोषणा करतील.(वृत्तसंस्था)