ब्रिटनच्या महाराणीचा तनखा वाढला
By admin | Published: June 30, 2017 12:33 AM2017-06-30T00:33:14+5:302017-06-30T00:33:14+5:30
ब्रिटनच्या सम्राज्ञी आणि राष्ट्रकुलाच्या प्रमुख महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या शाही तनख्यात ब्रिटिश सरकारने तब्बल ७८ टक्क्यांनी वाढ केली आहे.
लंडन : ब्रिटनच्या सम्राज्ञी आणि राष्ट्रकुलाच्या प्रमुख महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या शाही तनख्यात ब्रिटिश सरकारने तब्बल ७८ टक्क्यांनी वाढ केली आहे. अलीकडच्या काळात तनख्यात झालेली ही सर्वांत मोठी वाढ आहे.
सन २०१६-१७मध्ये महाराणी एलिझाबेथ यांना शाही तनखा म्हणून सरकारी तिजोरीतून ४२.८ दशलक्ष पौंड देण्यात आले. आता ही रक्कम ७६.१ दशलक्ष पौंड करण्यात आली आहे. हा तनखा पुढील १० वर्षे कायम राहील.
शाही कुटुंबाचे वास्तव्य असलेल्या बकिंगहॅम राजप्रासादाच्या दुरुस्ती आणि नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. प्रामुख्याने तो खर्च लक्षात घेता तनखा वाढविला आहे. अभ्यागतांना अधिक सुलभतेने ये-जा करता यावी यासाठी राजप्रासादात बदल केले जातील. शिवाय ६० वर्षांहून अधिक जुने वायरिंग व पाइपही बदलले जातील.
शाही तिजोरीच्या मंजूर हिशेबानुसार सन २०१६-१७मध्ये शाही कुटुंबाचा खर्च ५६.८ दशलक्ष पौंड एवढा झाला. त्यापैकी ४२.८ दशलक्ष पौंड सरकारी तिजोरीतून देण्यात आले व बाकीची रक्कम शाही मालमत्तांमधून उत्पन्न म्हणून मिळाली. अनेक भव्य इमारती, प्रासाद व अन्य इमारती, अनेक फार्म आाणि कित्येक समुद्रकिनारे शाही मालकीचे आहेत. त्यातून मिळणारे उत्पन्न सरकारी तिजोरीत जमा होते व त्यापैकी ठरावीक रक्कम राजघराण्यातील व्यक्तींना त्यांच्या शाही जबाबदाऱ्या व कार्यक्रम पार पाडण्यासाठी उपलब्ध करून दिली जाते. (वृत्तसंस्था)