ब्रिटिश संसदेचं ब्रेक्झिट कराराविरोधात मतदान; पंतप्रधान थेरेसा मे यांना धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2019 07:25 AM2019-01-16T07:25:07+5:302019-01-16T07:28:15+5:30

ब्रेक्झिटची प्रक्रिया आणखी लांबणार

British Pm theresa may Faces Defeat In Historic Brexit Deal Vote | ब्रिटिश संसदेचं ब्रेक्झिट कराराविरोधात मतदान; पंतप्रधान थेरेसा मे यांना धक्का

ब्रिटिश संसदेचं ब्रेक्झिट कराराविरोधात मतदान; पंतप्रधान थेरेसा मे यांना धक्का

Next

लंडन: ब्रिटिश संसदेनं ब्रेक्झिट कराराविरोधात मतदान केलं आहे. त्यामुळे पंतप्रधान थेरेसा मे यांना मोठा धक्का बसला आहे. ब्रेक्झिट कराराविरोधात तब्बल 432 सदस्यांनी मतदान केलं. तर 202 सदस्यांनी ब्रेक्झिटच्या बाजूनं कौल दिला. त्यामुळे ब्रिटनला युरोपियन युनियनपासून दूर होण्यास आणखी  कालावधी लागू शकतो. हा परिस्थितीत पंतप्रधान थेरेसा मे यांच्यावर राजीनामा देण्याची नामुष्कीदेखील ओढावू शकते.
 
ब्रिटननं युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्यासाठी 29 मार्चपर्यंतची मुदत निश्चित केली होती. याला अद्याप दोन महिन्यांचा कालावधी आहे. मात्र ब्रेक्झिटबद्दलचा प्रस्ताव ब्रिटिश संसदेनं संमत केलेला नाही. त्यामुळे ब्रेक्झिटला आणखी काही काळ लागू शकतो. यासाठी आता ब्रिटनकडून युरोपियन युनियनकडे मुदतवाढ मागितली जाण्याची शक्यता आहे. संसदेतील मतदानाआधीच पंतप्रधान थेरेसा मे यांना अपयशाची भीती सतावत होती. मे यांच्या पक्षातील अनेकांच्या मनात ब्रेक्झिट कराराबद्दल नाराजी आहे. त्यामुळेच मे यांनी गेल्या महिन्यात संसदेतलं मतदान टाळलं होतं. 

युरोपियन युनियनमधून बाहेर पडावं की नाही, याबद्दल 23 जून 2016 रोजी ब्रिटनमध्ये जनमताचा कौल घेण्यात आला. त्यात 51.9 टक्के लोकांनी बाहेर पडण्याच्या बाजूनं मत नोंदवलं. तेव्हापासून ब्रेक्झिटची प्रक्रिया सुरू झाली. गेल्या डिसेंबरमध्ये ब्रिटिश संसदेच्या कनिष्ठ सभागृहात (हाऊस ऑफ कॉमन्स) या संदर्भात मतदान होणार होतं. मात्र पराभवाच्या भीतीनं पंतप्रधान मे यांनी मतदान पुढे ढकललं. यानंतर विरोधी पक्ष असलेल्या मजूर पक्षाचे नेते जेरेमी कॉर्बेन यांनी पंतप्रधान मे यांना लक्ष्य केलं. खासदारांच्या शंका दूर करण्यात पंतप्रधानांना पूर्णपणे अपयश आल्याची टीका कॉर्बेन यांनी केली होती. 
 

Web Title: British Pm theresa may Faces Defeat In Historic Brexit Deal Vote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.