‘चाइल्ड ग्रूमिंग गँग’प्रश्नी ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर वादात! काय आहे हे प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 09:56 IST2025-01-11T09:56:09+5:302025-01-11T09:56:47+5:30

वादग्रस्त प्रसिद्ध व्यक्तींच्या यादीत आता ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचंही नाव समाविष्ट झालं आहे

British Prime Minister Keir Starmer in controversy over 'child grooming gang' issue! What is this case? | ‘चाइल्ड ग्रूमिंग गँग’प्रश्नी ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर वादात! काय आहे हे प्रकरण?

‘चाइल्ड ग्रूमिंग गँग’प्रश्नी ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर वादात! काय आहे हे प्रकरण?

सध्या अनेक जगप्रसिद्ध व्यक्ती चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत आणि त्यांच्यावर टीकाही होत आहे. त्यात अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन अग्रस्थानी आहेत. बायडेन यांनी त्यांच्या आरोपी मुलाला ‘माफ’ केल्यामुळे, अमेरिकेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार- ‘प्रेसिडेंशियल मेडल ऑफ फ्रीडम’ वादग्रस्त प्रसिद्ध उद्योगपती जॉर्ज सोरोस यांना दिल्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठते आहे. 

वादग्रस्त प्रसिद्ध व्यक्तींच्या यादीत आता ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचंही नाव समाविष्ट झालं आहे. ‘चाइल्ड ग्रूमिंग गँग’ संदर्भात अमेरिकन अब्जाधीश आणि जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत असलेले इलॉन मस्क यांनीही कीर स्टार्मर यांना अक्षरश: झोडपून काढलं. त्यांनी तर ब्रिटनचे राजे किंग चार्ल्स यांनाच आवाहन केलं आहे की स्टार्मर यांना पंतप्रधानपदावरुन हटवा, त्यांचा राजीनामा घ्या. एवढंच नाही, सोशल मीडियावर लिहिलेल्या एका पोस्टमध्ये तर त्यांनी स्टार्मर यांना जेलमध्ये टाका, अशीही मागणी केली आहे. गेल्या अनेक काळापासून स्टार्मर हे ‘चाइल्ड ग्रूमिंग गँग’ला पाठीशी घालताहेत. ब्रिटनचे पंतप्रधान झाल्यानंतरही त्यांच्या या भूमिकेत बदल झालेला नाही, असं मस्क यांचं म्हणणं आहे.

पण काय आहे हे ‘चाइल्ड ग्रूमिंग गँग’ प्रकरण? या प्रकरणाची मुळं तशी खूप आधीची, म्हणजे साधारण २००८पासूनची आहेत, पण २०२२मध्ये या प्रकरणाला मोठ्या प्रमाणात वाचा फुटली. काही पीडित मुली, महिला मोठ्या धाडसानं पुढे आल्या आणि त्यांनी आपबिती जगासमोर मांडली. पाकिस्तानी मूळ असलेल्या एका गँगनं वेळोवेळी आपल्यावर केलेल्या अत्याचाराची माहिती त्यांनी दिली. ही गँग काय दुष्कर्म करायची? अल्पवयीन मुलं हुडकायच्या, त्यांना ड्रग्ज द्यायचे, पैशांचं आमिष दाखवायचं, त्यांचं ब्रेनवॉश करायचं आणि त्यांना फसवून त्यानंतर त्यांच्यावर बलात्कार करायचा.. बराच काळ हे प्रकरण बाहेर आलेलं नव्हतं, पण या मुली धैर्यानं पुढे आल्या, आपल्यावर झालेला अन्याय त्यांनी जगासमोर ठेवला आणि सगळ्यांनाच धक्का बसला. २००८ ते २०१३ या काळात अशी अनेक प्रकरणं बाहेर आली. नेमक्या त्याच काळात कीर स्टार्मर हे प्रॉसिक्युशन सर्व्हिसचे संचालक होते. 

आपल्यावरील या आराेपांना एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन कीर स्टार्मर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. इलॉन मस्क यांचं नाव न घेता ते म्हणाले, कुठलीही खातरजमा न करता, कुठलीही योग्य माहिती न घेता काही लोक खोटी आणि चुकीची माहिती जगभरात पसरवत आहेत. त्यांना पीडितांमध्ये कवडीचाही रस नाही, त्यांचं भलं व्हावं असंही त्यांना वाटत नाही, त्यांना फक्त स्वत:मध्ये, कायम स्वत:च्या प्रसिद्धीतच रस असतो. हे लोक आजवर तेच करत आले आणि यापुढेही तेच करीत राहतील. 

स्टार्मर यांचं म्हणणं आहे, २००८ ते २०१३ या काळात प्रॉसिक्युशन सर्व्हिसचा मी संचालक होतो आणि त्याच वेळेस ‘चाइल्ड ग्रूमिंग गँग’विरुद्ध पहिला गुन्हा दाखल करण्यात आला होता. ज्या ज्या वेळी मी कोणतंही प्रकरण हाती घेतलं, त्या त्या प्रत्येक वेळी मी ते तडीस नेलं, न्यायालयापर्यंत पोहोचवलं आणि संबंधितांवर कारवाईही झाली..

या मुलींनी आपल्यावर अत्याचार झाल्याची तक्रार केल्यानंतर प्रो. एलेक्स जे यांची एक समिती गठित करण्यात आली. समितीनं चौकशी केल्यावर तेही प्रचंड हादरले. १९९७ ते २०१३ या काळात तब्बल १३०० मुलींचं लैंगिक शोषण केल्याचं त्यांच्या लक्षात आलं. मुख्य म्हणजे ज्यांनी या मुलींवर लैंगिक अत्याचार केले, त्यात पाकिस्तानी मुळाच्या आरोपींची संख्या सर्वाधिक होती. 

बहुतांश अल्पवयीन मुलींना फूस लावून, त्यांना विविध प्रकारची आमिषं दाखवून फसविण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची तस्करीही करण्यात आली. यासंदर्भातलं सर्वांत पहिलं प्रकरण रॉदरहॅम या शहरात घडलं होतं. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर उत्तर इंग्लंडच्या इतर अनेक शहरांत असेच प्रकार घडल्याचं आढळून आलं. समितीच्या अहवालात दोषी पाकिस्तानी आरोपींवर कारवाईची शिफारस करण्यात आली होती. 
रॉदरहॅम शहरात जे घडलं आणि जेवढ्या मोठ्या प्रमाणात घडलं, त्यामुळे जनमानस अक्षरश: ढवळून निघालं. त्यामुळे हे प्रकरण तेव्हा ‘रॉदरहॅम स्कँडल’ या नावानं ओळखलं जाऊ लागलं. त्यानंतर त्याला ‘पाकिस्तानी ग्रूमिंग रेप गँग’ असंही म्हटलं जाऊ लागलं. 

पाकिस्तानवर कोरडे

या प्रकरणामुळे कीर स्टार्मर यांच्यावर जशी टीका झाली, त्याचप्रमाणे पाकिस्तान आणि पाकिस्तानी तरुणांवरही मोठी टीका झाली. पाकिस्तानी तरुण अल्पवयीन निष्पाप तरुणींना फसवून त्यांच्यावर दुष्कर्म करतात, त्यांची तस्करी करतात, यावरून पाकिस्तानवर कोरडे ओढण्यात आले. यातील काही प्रकरणांत तर मुलींची युरोपातही तस्करी करण्यात आली होती. पाकिस्तानवर जागतिक पातळीवर तंबी देण्यात यावी, त्यांच्या नाड्या आवळण्यात याव्यात, अशीही मागणी करण्यात आली होती.

Web Title: British Prime Minister Keir Starmer in controversy over 'child grooming gang' issue! What is this case?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.