इंग्रजांची सुटका!
By admin | Published: June 25, 2016 03:19 AM2016-06-25T03:19:49+5:302016-06-25T03:19:49+5:30
२८ देशांच्या युरोपीय महासंघातून ब्रिटन बाहेर पडणार, हे अखेर शुक्रवारी स्पष्टच झाले. जनमत चाचणीद्वारे तेथील जनतेने वेगळे (ब्रेक्झिट) होण्याच्या बाजूने दिलेला कौल म्हणजे इंग्रजांची
लंडन : २८ देशांच्या युरोपीय महासंघातून ब्रिटन बाहेर पडणार, हे अखेर शुक्रवारी स्पष्टच झाले. जनमत चाचणीद्वारे तेथील जनतेने वेगळे (ब्रेक्झिट) होण्याच्या बाजूने दिलेला कौल म्हणजे इंग्रजांची (युरोपियन युनियनमधून) सुटका असेच मानले जात आहे.
तब्बल २३ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या महासंघातून बाहेर पडण्याचा कौल जनतेने देताच बे्रक्झ्रिटवादी जनतेने जल्लोष केला असला तरी भारतासह जगातील
अन्य देशांवर आणि त्यातही युरोपवर काय परिणाम होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र ईयूमधून बाहेर पडण्याच्या बाजूने असलेल्यांना आता अर्थव्यवस्थेला गती मिळेल आणि स्थलांतरितांवर नियंत्रण मिळविता येईल, असे वाटत आहे.
जनमत चाचणीत ५१.९ टक्के लोकांनी युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याच्या बाजूने, तर ४८.१ टक्क्यांनी युरोपियन महासंघात राहण्याच्या बाजूने मत दिले. या निकालानंतर जगभरातील बाजारात मोठी उलथापालथ झाली आणि ब्रिटनचे पौंड हे चलन १९८५ नंतर प्रथमच डॉलरच्या तुलनेत १० टक्क्यांनी घसरले आहे.
निकालांनंतर महासंघातून बाहेर पडण्यासाठी मोहीम उघडणारे ब्रिटनच्या इंडिपेंडेन्स पार्टीचे प्रमुख नायजेल फारेज यांनी आनंद व्यक्त केला. (वृत्तसंस्था)
स्कॉटलंडने मात्र युरोपियन संघात कायम राहण्याच्या बाजूने ६२ टक्के मते दिली असून, आता तिथे ब्रिटनपासून स्वतंत्र होण्यासाठी नव्याने जनमत घेण्यात यावी, अशी मागणी पुढे आली आहे. स्कॉटलंडमध्ये २०१४ मध्ये झालेल्या जनमत चाचणीत ब्रिटनमध्ये राहण्याचा कौल आढळून आला होता. ब्रेक्झिटनंतर जागतिक आर्थिक केंद्र असलेल्या लंडनच्या भवितव्याबाबतही तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
कॅमेरून देणार राजीनामा!
ब्रिटनने वेगळे होण्याच्या बाजूने कौल दिल्यानंतर पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून
यांनी राजीनाम्याची घोषणा केली. आॅक्टोबरपर्यंत देशाला नवा पंतप्रधान मिळेल, असे
ते म्हणाले. कॅमेरून यांनी ब्रिटनने युनियनमध्ये कायम राहावे यासाठी मोहीम चालविली होती.
लगेचच काहीही बदलणार नाही. आम्ही आता युरोपियन युनियनसोबत चर्चेची तयारी करायला हवी. देशाला पुढे नेण्यास आता नव्या नेतृत्वाची गरज आहे. हा निर्णय कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या आॅक्टोबरमध्ये होणाऱ्या संमेलनात घेतला जाईल. देशाचे जहाज स्थिर ठेवण्यास मी पदावर राहणे महत्त्वपूर्ण आहे, परंतु देशाला त्याच्या नव्या लक्ष्यापर्यंत नेण्यासाठी मी योग्य नाही. - कॅमेरून
ब्रेक्झिट म्हणजे? ब्रेक्झिट हा शब्द ब्रिटिश आणि एक्झिट या दोन शब्दांना एकत्र करून तयार झाला आहे. युरोपियन युनियनमधून ब्रिटनची एक्झिट असा त्याचा
अर्थ होतो.
युरोपियन युनियन म्हणजे?
28 देशांचा समूह आहे.
त्यात पश्चिम युरोपातील ब्रिटन, फ्रान्स, जर्मनीसारख्या मुख्य देश आहेत.
या सर्व २८ देशांचे नागरिक इतर कुठल्याही सदस्य देशात मुक्तपणे प्रवास आणि व्यापार, नोकरी करू शकतात. त्यासाठी युरो हे स्वतंत्र चलनही आहे.
संबंधांना चालना...
युरोपीय महासंघातून ब्रिटन बाहेर पडल्याने भारत व ब्रिटन यांच्या संबंधांना चालना मिळेल. युरोपीय संघातून बाहेर पडल्यानंतर आम्ही भारताशी व्यापार करार करण्यास स्वतंत्र आहोत. भारत - ब्रिटन यांच्यात व्यापार वाढण्यासाठी हा निर्णय महत्वाचा आहे.
- प्रिती पटेल,
वरिष्ठ मंत्री, ब्रिटन
महासंघ मृत्युशय्येवर...
युरोपीय महासंघ मृत्युशय्येवर आहे. ब्रिटनला आता ब्रेक्झिट सरकारची तसेच महासंघातून बाहेर पडण्याच्या पद्धतीवर वाटाघाटी सुरू करण्याची गरज आहे. आम्ही युनियनच्या भिंतीतील पहिली वीट काढली असून, सार्वभौम देशांच्या युरोपच्या दिशेने हे पहिले पाऊल आहे.
- नायजेल फारेज,
इंडिपेंडन्ट पार्टी प्रमुख
लोक नाराज आहेत...
महासंघातून बाहेर पडण्याचा ब्रिटनचा निर्णय महान गोष्ट आहे. अद्भुत-ऐतिहासिक कौल. आम्हाला अत्यंत आनंद झाला. नाराज असल्याने लोकांनी ब्रेक्झिटच्या बाजूने कौल दिला. देशाच्या सीमेबाबत, देशात बाहेरून लोक येत असल्याबद्दल ते नाराज आहेत.
- डोनाल्ड ट्रम्प,
अमेरिकेचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार
इंग्लंडला का पडायचे होते बाहेर?
निर्वासिततांचा प्रश्न
महासंघातील सदस्य देशामधून येणारे बेरोजगार लोक आणि स्थलांतरित हा इंग्लंडमध्ये कळीचा मुद्दा बनला. गेल्या वर्षभरात अडीच लाख लोक इंग्लंडमध्ये आश्रयास आल्याचा दावा महासंघाच्या विरोधकांनी केला. हे असेच सुरु राहिले तर येत्या दशकभरात निवार्सित आणि स्थलांतरिताची संख्या २० लाखांपर्यंत पोहोचेल अशी भीती होती. त्यामुळे इंग्लंड आणि ब्रिटिश नागरिकांची सुरक्षा धोक्यात येण्याचा आक्षेप घेतला गेला. महासंघातून बाहेर पडल्यास याप्रश्नावर इंग्लंड स्वत:चे धोरण ठरवू शकतो.
मांडलिकत्वाची भावना
युरोपियन महासंघात राहिल्यास स्थलांतरित, निर्वासितांचा प्रश्न, व्यापार, सुरक्षा धोरण, दहशतवादी विरोधी लढा यावर महासंघाचाचे नियंत्रण राहील. इंग्लंडकडे कोणताही अधिकार नसेल अशी सवर्सामान्य नागरिकांची भावना होती.
बिनकामांचा खर्च
युरोपीयन संघामुळे इंग्लंडच्या व्यापारावर अनेक बंधने आले होती. संघाला वर्षाला जेवढी रक्कम दिली जाते त्या तुलनेत फार कमी फायदा मिळतो. दर आठवड्याला ३५० दशलक्ष पौंड महासंघाला दिले जातात असा दावा केला जातो. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था आणि एनएचएस सारख्या आरोग्याच्या सेवा कोलमडल्याचा राग ब्रिट्रीश नागरिकांमध्ये होती. त्यातूनच युरोपियन संघातून बाहेर पडण्याची मानसिकता बळावली. युरोपीयन संघातील अनेक राष्ट्रांची (पोर्तुगाल, ग्रीस, स्पेन, इटली) यांची अर्थव्यवस्था अरिष्टात सापडल्याचा परिणाम इंग्लंडच्या अर्थव्यवस्थेवर होत असल्याची मानसिकता वाढली होती.
अन्य राष्ट्रांतही एक्झिटचे वारे
आता युरोपमधील अन्य देशांतही एक्झिटची चर्चा सुरू झाली आहे. किमान फ्रान्स, आॅस्ट्रिया आणि नेदरलँड्स या देशांमधील जनतेला सार्वमत घेऊन महासंघातून बाहेर पडावे, असे वृत्त युरोपमधील प्रसारमाध्यमांमध्ये दिसत आहे. फ्रान्स, नेदरलँड्स, जर्मनी, झेकोस्लोव्हाकिया, हंगेरी, स्वीडन येथे घेतलेल्या चाचणीत हे दिसून आले.
आॅस्ट्रिया 40%
लोकांची सार्वमत घेण्याची मागणी
नेदरलँड 53%
जनतेचे बाहेर पडण्यास अनुकूल
झेक रिपब्लिक57%
लोकांना महासंघात जोखमीचे वाटते
इटली58%
महासंघाबाबात सार्वमत हवे आहे
हंगेरी38%
जनतेला युरोपीय महासंघातबाबत सार्वमत घेणे आवश्यक वाटते