‘ब्रेक्झिट’वरून लेबर पक्षात बंडाळी!

By admin | Published: June 27, 2016 04:24 AM2016-06-27T04:24:31+5:302016-06-27T04:24:31+5:30

युरोपीय महासंघात ब्रिटनने राहावे की नाही, या मुद्यावर घेण्यात आलेले सार्वमत हाताळण्यावरून येथील विरोधी पक्ष असलेल्या लेबर पार्टीत तीव्र असंतोष निर्माण झाला

Brokitat's Labor Party rebellion! | ‘ब्रेक्झिट’वरून लेबर पक्षात बंडाळी!

‘ब्रेक्झिट’वरून लेबर पक्षात बंडाळी!

Next


लंडन : युरोपीय महासंघात ब्रिटनने राहावे की नाही, या मुद्यावर घेण्यात आलेले सार्वमत हाताळण्यावरून येथील विरोधी पक्ष असलेल्या लेबर पार्टीत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. लेबर पार्टीचे नेते जेरेमी कॉर्बिन यांच्याविरुद्ध बंड झाले आहे. त्यांनी शॅडो कॅबिनेटमधील परराष्ट्रमंत्र्यांना काढून टाकले असून, अन्य तीन सदस्यांनी राजीनामा दिला आहे.
कॉर्बिन यांच्या नेतृत्वावर आपला विश्वास राहिलेला नाही, असे वक्तव्य शॅडो परराष्ट्रमंत्री हिलरी बेन यांनी केले होते. त्यांनी तसे विधान करताच कॉर्बिन यांनी त्यांना काढून टाकले. त्यानंतर थोडक्याच वेळात आरोग्यमंत्री हैदी अलेक्झांडर यांनी राजीनाम्याची घोषणा केली. त्यानंतर ग्लोरिया डे पियरो आणि अलन मरे यांनीही राजीनाम्याची घोषणा केली.
आता शॅडो कॅबिनेटमधील अन्य मंत्रीही राजीनाम्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. हे सर्व जण कॉर्बिन यांच्यावर नाराज असून, ते त्यांच्या राजीनाम्याची मागणी करीत आहेत. यापुढेही कॉर्बिन नेतेपदी राहिल्यास सार्वत्रिक निवडणुकीत पक्षाला विजय मिळण्याची आपल्याला खात्री नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. कॉर्बिन यांच्याविरुद्ध अविश्वासाचा प्रस्ताव दाखल झाला असला तरीही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलेले आहे. प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार बेन अन्य शॅडो मंत्र्यांना राजीनामे देण्यासाठी चिथावणी देत आहेत. लेबर खा. डेम मार्गारेट आणि अ‍ॅन कॉफी यांनी कॉर्बिन यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल केलेला आहे. या प्रस्तावाला घटनात्मक पाठबळ नसले, तरीही त्यातून कॉर्बिन यांच्याविरुद्ध असलेला असंतोष जाहीर झाला आहे. (वृत्तसंस्था)
>स्कॉटलंडला हवे स्वातंत्र्य
ग्रेट ब्रिटनमधून फुटून बाहेर
पडण्याची जोरदार मागणी स्कॉटलंडमध्ये होत आहे. स्कॉटलंड सरकारच्या प्रमुख निकॉल
स्टर्जन म्हणाल्या की, २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या सार्वमतात ब्रिटनमध्ये राहण्याचा आम्ही
निर्णय घेतला होता; पण आता
तोच ब्रिटन अस्तित्वात नाही.
>‘ब्रेक्झिट’ खेदजनक; पण भारतावर परिणाम नाही
‘ब्रेक्झिट’ ही एक खेदजनक घटनाघडामोड आहे; पण त्याचा भारतावर परिणाम होणार नाही. कारण भारताची मूलभूत आर्थिक स्थिती चांगली आहे, असे केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रह्मण्यम यांनी म्हटले आहे.
‘एडीआरआय’ या संस्थेच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात त्यांनी हे मत व्यक्त केले. ते म्हणाले की, ‘ब्रेक्झिट’ ही खेदजनक आहे. भारतीय अर्थव्यवस्था मजबूत आहे. त्याचा मुकाबला करण्यास सक्षम आहे.
‘ब्रेक्झिट’ ही अत्यंत महत्त्वपूर्ण घडामोड असल्याचे पुन्हा एकदा सांगताना ते म्हणाले की, त्याने राजकीय व आर्थिक असे दोन्ही परिणाम ब्रिटन-युरोप यांना मोजावे लागतील.
>बाहेर पडा : युरोपीय संघ प्रमुखांनी (ईयू)ब्रिटनने संघातून त्वरित बाहेर पडावे व याबाबत लगेचच वाटाघाटी सुरू कराव्यात, अशी मागणी केली आहे.
>२० लाख लोकांच्या सह्या : ब्रिटनने युरोपीय महासंघात राहावे, की नाही याबाबत दुसऱ्यांदा सार्वमत घेतले जावे, ही मागणीबाबतच्या ‘पिटिशन’वर आतापर्यंत २० लाख ५० हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी स्वाक्षऱ्या केल्या.
>मर्केल यांचा इशारा : जर्मन चॅन्सलर अँजेला मर्केल यांनी मात्र यासंदर्भातील घाईला विरोध केला आहे. घाई केल्यास युरोपात आणखी फाटाफूट होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. युरोपला हा मोठाच धक्का आहे, यात वाद नाही, असे त्या म्हणाल्या.

Web Title: Brokitat's Labor Party rebellion!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.